१५ जून...♥️

काही तारखा कितीही वर्ष उलटून गेली तरीही कायम लक्षात असतात... त्यातलीच एक तारीख म्हणजे १५ जून... १५ जून म्हटलं, की कुठेही असलो तरीही आठवतो तो मातीचा सुवास, पाऊस असला तरीही 'आज अनेक दिवसांनी मित्रमैत्रीणी भेटणार' हा उत्साह... छत्री, दप्तर, वह्या सगळ्या गोष्टी नवीन... वह्या-पुस्तकं भिजू नये म्हणून काळजीपूर्वक घातलेली प्लॅस्टिकची पिशवी... आणि भर पावसात छत्री किंवा रेनकोट घालून न कंटाळता शाळेत जाणारे आपण, कारण १५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस... आणि शाळेचा पहिला दिवस म्हणजे १५ जून हे समीकरण ठरलेलं...

वार्षिक परीक्षा संपायची आणि एक मे ला निकाल लागायचे... निकाल हातात मिळाले की पास/नापास हा शेरा बघेपर्यंत 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी सुरु होईल' ही सूचना मिळायची...निकालावर देखील तेच लिहिलेलं असायचं... 'त्यात इतकी सूचना वगैरे द्यायची काय गरज? सगळ्यांना माहितीये की १५ जून लाच शाळा सुरु होते' असं आम्ही गंमतीने म्हणायचो😂 कारण '१५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस' हे आमच्यासाठी वैश्विक सत्य होतं...  कधीतरी १५ जून ला रविवार यायचा आणि मग शाळा १६ जून ला सुरु व्हायची तो भाग वेगळा असला तरीही आजही कोणत्याही नाइंटीज किड्स ना 'शाळा कधी सुरु होणार' असं विचारलंत तर १५ जून हेच उत्तर येईल...(नाइंटीज किड्स म्हटलं कारण हल्ली CBSE ISCE अशी अनेक बोर्ड्स आणि प्रत्येकाच्या शाळा सुरु करण्याच्या तारखा आणि schedule वेगळं असल्यामुळे आजकालच्या मुलांना १५ जून चं महत्त्वं नाइंटीज किड्स इतकं नाही समजणार...😂)

निकाल लागला रे लागला की सगळे गावी पळायचे... गावी केलेली मजा, खाल्लेले आंबे... वाचलेली गोष्टीची पुस्तकं... संध्याकाळी खेळून आल्यावर एकत्र बसून पाहिलेला टीव्ही...तेव्हा आजच्यासारखं whatsapp insta नसल्यामुळे कधीतरी गावच्याच लॅंडलाईनवरून मित्रमैत्रीणींना केलेले फोन अशी सगळी मजा करून झाली की मग कंटाळा यायला लागायचा... वार्षिक परीक्षा सुरु असताना ' एकदाची ही परीक्षा संपली की आता महिनाभर धम्माल करायची' असं प्लॅनिंग केलेलं असलं तरी काही दिवसांच्या सुट्टीनंतर मात्र शाळेची आठवण यायला लागायची आणि मनातल्या मनात १५ जून चं countdown सुरु व्हायचं...

गावाहून जूनच्या पहिल्या आठवड्यात परत यायचं... १३ आणि १४ जून म्हणजे एक मोठा सोहळा असायचा... नवं दप्तर, छत्री किंवा रेनकोट, खाकी कव्हर्स, वह्यापुस्तकांवर लावायचे स्टिकर्स, कंपासबॉक्स... पेन पेन्सिल्स...वह्या (आधीच्या इयत्तेत असताना प्रत्येकाने एक एक सिनिअरसोबत पुस्तकांसाठी सेटिंग लावलेली असल्यामुळे पुस्तकं नवी घ्यायची गरज लागायची नाही😂) घरी येऊन नव्या दप्तराचं unboxing करायचं... वह्यापुस्तकांना छान कव्हर्स घालून सुंदर अक्षरात नावं घालायची आणि 'शाळेच्या पहिल्या दिवसाची' दिवसाची वाट बघत बसायचं... आदल्या दिवशी 'उद्या शाळेत किती मजा येईल' या विचाराने झोपच लागायची नाही आणि दुसऱ्या दिवशीही जरा लवकरच जाग यायची... 

अखेर व्यवस्थित तयार वगैरे होऊन शाळेत जायला निघायचं... १५ जून ला शाळेत जाईपर्यंत नसलेला पाऊस शाळेत जायला निघालं किंवा अर्ध्या रस्त्यात पोहोचलं की हमखास सुरु व्हायचा हा माझा आतापर्यंतचा अनुभव (बहुतेक आम्ही घेतलेल्या नव्या छत्र्यांचाही वापर व्हावा असं पावसाला वाटत असेल😂)...शाळेत पोहोचलं की रांगेत उभं रहायचं...सगळे मित्रमैत्रीणी इतक्या दिवसांनी भेटल्यामुळे इतक्या गप्पा रंगायच्या की रांगेत उभं रहायचा त्रासही वाटायचा नाही... 'ज्या बेंचवर बसणार तोच बेंच पूर्ण इयत्ताभर' असा अलिखित नियम असल्यामुळे बेंच पकडण्यासाठी केलेली धडपड😂... वर्गात पोहोचून settle झाल्यावर अनेक दिवसांनी ऐकलेली प्रार्थना....झालेली हजेरी... नवा हजेरी क्रमांक...नवं वेळापत्रक... नवे तास... नवा syllabus... अनेक दिवसांनी खाल्लेली शाळेतली खिचडी... या सगळ्या गोष्टी आजही जशाच्या तशा आठवतात आणि परत शाळेत जाऊन बसावसं वाटतं.... १५ जून ची अजून एक खासियत म्हणजे या दिवशी कोणीच शिकवायला सुरुवात करायचे नाहीत... गृहपाठदेखील मिळायचा नाही त्यामुळे शेवटची घंटा वाजली की 'इतक्या लवकर शाळा कशी सुटली' असं वाटायचं... घरी पोहोचलं की घरच्यांना शाळेतल्या गमतीजमती सांगायच्या... शाळेत मिळालेलं वेळापत्रक कागदावर लिहून तो कागद कपाटावर चिकटवायचा (म्हणजे दप्तर भरायला सोपं जाईल ना😂)... संध्याकाळी 'आज मी पंख्याखालचा बेंच कसा पकडला' या गोष्टी रंगवून रंगवून सोसायटीतील मित्रमैत्रीणींना सांगायच्या😂 आणि दुसऱ्या दिवशी शाळा असल्यामुळे लवकर झोपायचं हा अगदी ठरलेला कार्यक्रम... 

हळूहळू routine लागायचं... अभ्यासाला सुरुवात व्हायची...  गृहपाठ वगैरे मिळायला लागायचे... वर्गपाठाच्या वह्या भरताना (नोट्स काढताना) पहिल्या काही 'सुंदर अक्षरात' लिहिलेल्या पानांची जागा कोंबडीचे पाय😂 घ्यायचे... गणितातली सूत्रं, विज्ञानातली प्रात्यक्षिकं, आणि मराठी हिंदी मधले  'पहिला पाऊस' 'मैने देखी हुई पहिली बारिश' असे constant निबंध, पत्रलेखन हे करता करता पहिल्या चाचणी परीक्षेचं वेळापत्रक यायचं आणि १५ जून चा नवेपणा संपून जायचा... काही महिन्यांनंतर 'कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतेय आणि मे महिन्याची सुट्टी लागतेय' असं वाटायला लागायचं...

१५ जून चं हे नवेपण फक्त नववीपर्यंत... नववीचा निकाल लागला आणि दहावीच्या extra claases मुळे शाळा लवकर सुरु झाली... नंतर कॉलेज आणि जॉब यांच्यात आमच्या नकळत १५ जूनचं नवेपणच नाहिसं झालं.... मात्र आजही १५ जून म्हटलं की मुसळधार पावसात पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन उत्साहात शाळेत जाणारे आपण आणि आपल्या मित्रमैत्रीणींची आठवण येते आणि at least '१५ जून चा एक दिवस' तरी परत शाळेत जाऊन बसावसं वाटतं....

तुमच्याकडेही १५ जून बद्दल काही छानछान आठवणी असतील तर नक्की शेअर करा....

-केतकी मोडक

Comments

  1. खरंच खूपच भारी होते ते शाळे मधले ते दिवस. एकदा परत जगता आले पाहिजे असं वाटतं कधी कधी. खूपच छान कंटेंट आहे केतकी👌

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिलंय . अरे जुने ब्लॉग कुठे आहेत मला जुने पण वाचायचे होते ईथे मला चार-पाचच दिसत आहेत .गेले कुठे बाकीचे ब्लॉग्स .🤔🤔

    ReplyDelete
    Replies
    1. https://somethingmanatla.blogspot.com/?m=1 ya link var miltil😊 thanks😊😊

      Delete
  3. https://somethingmanatla.blogspot.com/?m=1 ya link var miltil😊 thanks😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️