प्रिय २०२१...
प्रिय २०२१, उद्या तुझा शेवटचा दिवस... उद्या तू संपणार, तुझं कॅलेंडरही बदललं जाणार... नवीन वर्ष आलं, तरी सुरुवातीचे काही दिवस तरी चुकून तुझी आठवण काढली जाईलच म्हणा... इतके दिवस तारीख लिहिताना २०२१ लिहायची इतकी सवय झालीये ना, की नवीन वर्षाच्या सुरुवातीचे थोडे दिवस तरी तारीख लिहिताना लोचा होईलच... पण ऑफिशियली मात्र तू यापूढे नसणार... खरं सांगायचं, तर नवीन वर्षाकडून भरभरून अपेक्षा ठेवायची आता जरा भीतीच वाटते (याचं कारण तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये...) पण तरीही २०२० संपताना आम्ही तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या... खूप अपेक्षा... अगदी करोडो लोकांच्या अपेक्षा होत्या तुझ्याकडून... दहावीच्या वर्षात एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्याकडून ठेवाव्यात त्यापेक्षाही जास्त... २०२० खूपच आव्हानात्मक गेल्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं अगदी चूकीचंही नव्हतं, त्यामुळे त्या आपसूकच ठेवल्या गेल्या... एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडून इतक्या अपेक्षा ठेवल्या तर तो विद्यार्थीही घाबरून जाईल... पण तू मात्र करोडो लोकांच्या अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पूर्ण केल्यास... तुझ्या सुरुवातीचा काळ नक्कीच अवघड होता, तणावदायक होता....