मुंबई लोकल, मेरी जान
लहानपणापासून आपली काहीतरी फॅंटसी असते. कुठेही जायचं म्हटलं की 'तिकडे कसं जायचं' या प्रश्नावर रिक्षा किंवा बस वगैरे च्या फंदात न पडता 'लोकलने जाऊया' असं म्हणत घरच्यांचं शिक्कमोर्तब होत असल्यामुळे लोकलचा आणि माझा संबंध अगदी लहानपणपासूनचा (टेक्निकली स्पिकींग जेव्हा पिवळ्या रंगाची तिकीट्स मिळायची तेव्हापासूनचा🤣). पुढे अकरावी बारावीला अंधेरीपर्यत कॉलेज, इंजिनिअरिंग ला असतानासुद्धा कॉलेज वसईपर्यंत असल्यामुळे 'लोकल आणि मी' हा संबंध कधीही सुटला नाही. कॉलेजला येताजाता प्रत्येक वेळी लोकल मध्ये आमच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या मुली, महिला मॅचिंग पर्स, हातात फोन, कानात इअरफोन्स घेऊन वगैरे दिसल्या की 'या ऑफिसला चालल्या आहेत' हे लगेच कळायचं आणि वाटायचं यांचं लाईफ किती छान आहे (ऑफिसला जाणाऱ्या त्या मुलींपेक्षा खरं तर कॉलेजला जाणाऱ्या माझं लाईफच सगक्यात बेस्ट होतं, पण हे realize होण्याइतकं वय तेव्हा नव्हतं). 'एक दिवस आपण पण नोकरीला लागलो की असंच ट्रेनमधून स्टाईलमध्ये प्रवास करूया, ट्रेनमध्ये कोणी काही विकायला आलं की आपल्या स्वत:च्या कमाईतून सगळ्या गोष्टी विकत घेऊया' हीच माझी फॅंटसी होती आणि त्यामुळे नोकरीला लागल्यावरदेखील 'नोकरी लागण्याच्या आनंदापेक्षा आपली फॅंटसी पूर्ण होणार याचा जास्त आनंद मला होता.'
नंतर मात्र लॉकडाउन आलं आणि सगळंच बदललं. कोणत्यातरी movie मध्ये ऐकलं होतं 'जिंदगी मे कभी भी कोई पॅटर्न बनता दिखाई दे, तो उसे ब्रेक कर लेना चाहिये' आणि आमच्या बाबतीतही हेच झालं. बरेच महिने वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे ट्रेनचे धक्के खात, ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठायला लागणं या सगळ्या गोष्टी वाचल्या. आयुष्यात 'वर्क फ्रॉम होम' चा पॅटर्न तयार झाला आणि लहानपणापासूनची 'ट्रेनमधून ऑफिसला जायची' फॅंटसी मागे पडली.
काही महिन्यांनंतर सगळं बॅक टू नॉर्मल झाल्यामुळे वर्क फ्रॉम ऑफिस सुरु झालं आणि इतके दिवस सवय मोडल्यामुळे 'रोज ट्रेनमधून जायचं' या कल्पनेनेच अंगावर काटा आला. तरीही ऑफिसचा नियम असल्यामुळे 'और कोई रास्ता है तेरे पास?' असं म्हणत धीर करून लोकलमधून प्रवास करण्यासाठी मी तयार झाले.
सुरुवातीचे काही दिवस लहानपणची फॅंटसी विसरून 'आता रोज लोकलचे धक्के झेलावेच लागणार आहेत' हे स्वत:ला समजवण्यात गेले. रोज येताजाता 'कशाला ऑफिस सुरु झालं, मुंबईत रहाणं नको, लोकलचा प्रवासच नको, ऑफिसची रोज स्पेशल pick up drop कॅब सर्विस असली पाहिजे' असं खूप काही cribbing करण्यात गेले. एक दिवस ऑफिसहून घरी येताना नेहमीप्रमाणेच बसायला जागा मिळाली नव्हती. अनेकींना धक्के मारत आणि अनेकींचे धक्के खात दरवाज्यात उभं राहायला जराशी जागा मिळाली. 'आता उतरेपर्यंत उभ्यानेच जावं लागणार' असं मनात ठरवून परत मी मनातच cribbing करायला सुरुवात केली. मनात अनेक विचार सुरु होते, आणि माहिती नाही कसा; अचानक मनात विचार आला, 'आता मी कॉलेज संपवून नोकरी करतेय, स्वत:ची स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतेय, लोकलशिवाय मी खरंच इथपर्यंत पोहोचू शकले असते का?' कॉलेज असो वा इंजिनिअरिंग, स्वस्त आणि मस्त travelling चा पर्याय म्हणजे लोकल ट्रेन. कॉलेजचा अभ्यास असो वा travelling मध्ये आलेले ऑफिस कॉल्स, लोकल ट्रेन हे प्रत्येकाला आपलं दुसरं घर वाटत असतं. मुंबई लोकल्सना कितीही नावं ठेवली, तरी 'लोकल हिच एकमेव गोष्ट आहे जी आपणा मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करण्यात सर्वाधिक हातभार लावते'.
कुठेतरी ऐकलं होतं, 'आयुष्यात कधीही टेन्शन आलं किंवा लो फील व्हायला लागलं, तर थेरपी वगैरेला न जाता फक्त लोकल ट्रेन मधून एक फेरफटका मारून या, तुम्ही आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला लागाल'. अजून डीप विचार करायला गेलं, तर मला असं वाटतं, की लोकल , लोकलमधली माणसं आणि लोकलचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो. याच नजरेने मी आजूबाजूला पाहिलं. काही कॉलेजच्या मुली आपल्या करियर प्लॅन्स बद्दल एकमेकींशी चर्चा करत होत्या, काही महिला आपल्या ट्रेनच्या ग्रूपमधल्या मैत्रीणींशी गप्पागोष्टी करण्यात दंग होत्या, काहीजणी 'घर सांभाळून ऑफिसला जाणं किती कंटाळवाणी आहे हे कोणालातरी फोन वर सांगत होत्या, माझ्या बाजूला उभी असलेली एक मुलगी 'सॉरी सर, मेल चेक नहीं किया, आगे से ऐसा नहीं होगा, क्लायंट is my responsibility' असं काहीतरी बोलत होती (तिच्या फोनवरच्या बोलण्यावरून बॉस ने तिची शाळा घेतलीये हे कोणालाही समजलं असतं). हे सगळं बघत असताना मी ट्रेनच्या दरवाज्यापाशीच होते. शेजारहून एक ट्रेन गेली. त्या ट्रेन मध्ये देखील आतमध्ये खचाखच भरलेले, एक वीत पेक्षाही कमी जागेत दरवाज्यात उभे असलेले (rather दरवाज्यात लटकणारे) असंख्य प्रवासी पाहिले आणि मनात विचार आला, की हे सगळे लाखो लोक आपल्यातलेच आहेत. प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असणार आहेत, प्रत्येकाच्या जॉब मध्ये काहीतरी वैताग असणार आहे, दिवसभर नोकरी आणि प्रवास करून प्रत्येकजण थकलेला असणार आहे, पण कितीही थकले असले, तरी प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी स्वप्न आहेत. कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या डोळ्यात मी कॉलेजला असताना मला होती तशीच चांगले मार्क्स मिळवून पुढे जाण्याची इच्छा आहे, काहींना आपण स्वत:ला सिद्ध करण्याचं स्वप्न आहे, काहींच्या मनात 'आपण कमी मध्ये settle झालो, पण आपल्या मुलामुलींना भरपूर पुढे न्यायचं' असं स्वप्न आहे, काहींच्या मनात आपल्या संसाराला हातभार लावण्याचं स्वप्न आहे तर काहींच्या मनात दूसरी अजून चांगली नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे. या सर्वांप्रमाणेच माझ्याही डोळ्यात काही स्वप्न आहेत, आणि ही सगळी स्वप्नं साकार करण्यासाठी इतक्या लाखो लोकांचा आता जो प्रवास सुरु आहे, तो सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, लोकल मधून प्रवास करताना खरंतर हे सगळेच स्वप्नांच्या दिशेने प्रवास करतायत.
ट्रेनमधून प्रवास करणं म्हणजे 'टाईम मॅनेजमेंट, टिमवर्क, लहानलहान गोष्टींतून आनंद घेणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांची काळजी घेणं' या सगळ्या आयुष्य जगायला शिकवणाऱ्या 'मस्ट हॅव्ह' स्किल्स चं लाईव्ह ट्रेनिंग. 'ट्रेन यायच्या आधी प्लॅटफॉर्मवर पोहोचू या हिशोबाने घरातून निघणं, आणि येताना ऑफिसमधली सगळी कामं पटापट संपवणं', ट्रेन येताना दिसली की 'शास्त्र असतं ते' याप्रमाणे ट्रेन यायच्या आत एका क्षणात बॅग पुढे घेऊन, केस वर बांधून, हातातला फोन आणि एअरफोन्स बॅगेत ठेवून योग्य वेळेत ट्रेन पकडण्यासाठी सज्ज होणं या सगळ्या गोष्टी म्हणजे परफेक्ट example of time management. ट्रेनमध्ये चढलं की दरवाज्यातूनच कोणाकडेतरी आपली बॅग पास करायची आणि वर ठेवायला सांगायची; की बॅग सांभाळायचं टेन्शन संपलं. बॅगेची ही देवाणघेवाण इतकी पटकन होते, की 'परफेक्ट example ऑफ टीम वर्क' यालाच म्हटलं पाहिजे. आतमध्ये जाऊन सीट मिळेल या आशेने बसलेल्यांना 'कुठे उतरणार?' हा प्रश्न विचारला, आणि चुकूनमाकून जवळची सीट मिळाली, तर त्याचा आनंद नोकरीत 'लीव्ह अप्रूव्ह व्हायच्या' आनंदापेक्षाही जास्त मोठा असतो. लहान गोष्टींतून मिळणारा आनंद घ्यायला याहून अधिक चांगलं कोण शिकवणार?. ट्रेनमध्ये बसल्याबसल्या एकीने भाजी निवडायला सुरुवात केली, तरी चार हात तिला मदत करायला सज्ज होणार, प्रवास करताना कोणाला uneasy वाटायला लागलं, किंवा अचानक चक्कर वगैरे आली, तर दोन मिनिटांच्या आतच तीनचार पाण्याच्या बाटल्या, चार पाच चॉकलेट्स त्या व्यक्तीसमोर उभ्या रहाणार, कोणीतरी उठून आपली सीट तिला बसायला देणार, कोणीही रडताना दिसलं, तर कमीतकमी दोनतीन डोकी 'काय झालं' अशी आस्थेने चौकशी करणार, या सगळ्या गोष्टींतून एकमेकांना मदत करणं, एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी आपसूकच शिकल्या जातात. हा, आता लोकल ट्रेन आणि विशेषत: लेडिज कोच हा भांडणांसाठी बदनाम आहे हे खरं असलं, तरी इगो न दाखवता किंवा स्वत:ची चूक नसतानादेखील सॉरी म्हणणं (स्वत:ची चूक नसताना सॉरी म्हणणं चूकीचं असलं तरी हे स्कील बॉस आणि क्लायंट समोर लई म्हणजे लई उपयोगी ठरतं😜), शांतता टिकवण्यासाठी 'भांडण कुठे थांबवावं' हे skill सुद्धा लोकल ट्रेन शिकवते. (वर मी ज्या गोष्टी शेअर केल्यात त्याला काही व्यक्ती अपवादही असतील कदाचित, पण मेजॉरिटी विन्स याप्रमाणे जे मला जास्त जाणवलं, त्यावरून मी माझे विचार शेअर केलेयत.) त्यामुके खरंतर लोकलला 'अनेक life skills शिकवणारं विद्यापीठ' म्हणता येईल.
हा सगळा विचार करता करता 'आपण किती नशीबवान आहोत की आयुष्य जगायला शिकवणाऱ्या सगळ्यात भारी गोष्टीतून रोज प्रवास करतो' असं वाटायला लागलं. विचार सुरु असतानाच हळूहळू जागा करून मी बऱ्यापैकी आत आले होते. तितक्यात एकीने 'आप कबसे खडे हो, बैठ जाओ' असं म्हणत मला बसायला दिलं आणि 'लोकल आपल्याला एकमेकांना मदत करायला शिकवते' हे माझं मत किती योग्य आहे याची मला खात्री पटली.
त्यादिवशी घरी जाताना माझ्या मनात एक वेगळीच सकारात्मकता होती. इतक्या life skills सोबत त्यादिवशी लोकलने मला अजून एक गोष्ट शिकवली होती, ती म्हणजे 'कोणत्याही समस्येकडे बघण्याचा योग्य दृष्टीकोन.'
दुसऱ्या दिवशी मी कोणतीही तक्रार न करता आनंदाने ऑफिसमध्ये पोहोचले. लंच ब्रेकमध्ये गप्पा मारता मारता एक कलीग आधी मी म्हणत असे त्याप्रमाणेच 'लोकल का travelling कितना घटिया है रे, लोकल्स से travel करना मतलब सजा है' असं म्हणाली. 'कम्प्लेंट मत कर रे, अलग नजर से देख, लोकल का journey ही है जो तुझे जिंदगी जीना सिखायेगा' असं माझ्याच नकळत मी बोलून गेले, आणि आता खऱ्या अर्थाने 'मुंबई लोकल आपल्यात मुरलीये, आणि लहानपणची फॅंटसी आपण खऱ्या अर्थाने आणि कोणतीही तक्रार न करता जगू शकतो' याची खात्री पटली.
-केतकी मोडक
खूप छान. असेच लिहित रहा.
ReplyDelete