प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️
प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा,
आपली ओळख खूप वर्षांपूर्वीची... अगदी लहानपणापासून तुला बघत आले असल्यामुळे आपली फ्रेंडशीप तर खास आहेच, पण माझ्या मित्रमैत्रीणींपैकीदेखील अनेकजण तुझे जबरी फॅन्स आहेत, त्यामुळे आम्ही कधीही गप्पा मारत असलो, तरी तुझा विषय हमखास निघतोच... अर्थात, हे मी तुला सांगण्याची गरजच नाही, कारण तुझा फॅनबेस किती मोठा आहे हे तुला माहिती आहेच...
तर, आज तुझा चौदावा वाढदिवस. बरोबर चौदा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीव्हीवर तुझा पहिला एपिसोड प्रसारीत झाला. खरंतर तेव्हा कोणालाच वाटलं नसेल की एके दिवशी हिच सिरीयल सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करेल, अगदी आम्हा प्रेक्षकांनासुद्धा... पण काही गोष्टी निर्माण होतात त्याच मुळी रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी, आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे तू...
तसं बघायला गेलं, तर तू आम्हा फॅन्सना नेहमीच भेटत असतोस...तुला बघायची अशी खास वेळ आम्हाला कोणालाच माहिती नाहीये, कारण जेव्हा जेव्हा चॅनल लावू, तेव्हा तेव्हा तिकडे तूच सुरू असतोस... शनिवार रविवारी तर हमखासच... त्यामुळे भेट म्हणशील तर ती आपली रोजच होत असते... आता मी हे लिहायला बसलेय ना, तेव्हासुद्धा टीव्हीवर तूच सुरू आहेस, पण आज तुझा वाढदिवस असल्यामुळे म्हटलं थेट तुलाच काहीतरी लिहूया, आणि टीव्ही बंद करून हे लिहायला बसले...
तर, हमारे जमाने में जब हम स्कूल में हुआ करते थे (नाही नाही मी काही भिडे अंकलच्या जमान्यातली नाहीय), तेव्हा तुझी सुरुवात झाली... त्यावेळी आजच्यासारखं सोशल मिडीया, वेबसिरीज यातल्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या... त्यामुळे खेळाव्यतिरिक्त आमची एंटरटेनमेंट म्हणजे फक्त आणि फक्त तू. तुझी सुरुवात झाली, तेव्हा आम्ही शाळेत असल्यामुळे तुझ्या गोकुलधाम सोसायटीमधली छोटी टपूसेना आम्हाला आमचेच मित्रमैत्रिणी वाटायचे. त्यांची शाळेतली मस्ती, परीक्षेच्या आणि निकालाच्या दिवशी त्यांची उडालेली घाबरगुंडी बघताना आम्हीसुद्धा तुझाच एक भाग होऊन जायचो...हळूहळू तर आम्ही पूर्ण गोकुलधाम सोसायटीचाच एक भाग बनून गेलो... शाळेत जाताना किंवा मधल्या सुट्टीमध्ये गप्पा मारता मारतादेखील तुझा विषय हमखास निघायचा. मग, 'आज दया ना हे करणार आहे', 'काल टपूची एवढी मजा आली ना' असे संवाद ठरलेले असायचे. शाळेतून घरी आल्यावर अभ्यास झाला, की टीव्हीवर परत तुलाच बघत बसायचं, ते थेट आईचा ओरडा मिळेपर्यंत...परीक्षा सुरू झाली, की अभ्यासामुळे तुझं हे वेड जरा कमी करावं लागायचं. पण मग सगळे पेपर्स संपले रे संपले, की घरी आल्यानंतर टीव्ही लावून तुझे मिस झालेले सगळे एपिसोड्स आम्ही इज्जतमध्ये एकदाच बघून काढायचो (इज्जतमध्ये म्हटलं, कारण आणि परीक्षा संपलेली असल्यामुळे आईचा ओरडा मिळायचा नाही...)
आम्ही जसे जसे मोठे होत गेलो, तसातसा तुझ्या प्रसिद्धीचा आकडा वाढतच गेला, अजूनही वाढतोय... पुढे सोशल मिडिया आल्यामुळे तुझ्यावर असंख्य मिम पेजेस आली, अजूनही येतायत...लहानपणी केवळ टीव्हीवर जो लागलाय तोच एपिसोड बघणारे आम्ही आता मात्र युट्यूबच्या मदतीने स्वत:ला हवा तो एपिसोड बघू शकतो... तुझ्यावर आलेले मिम्स, व्हिडिओ एडिट्स, रिल्स सुद्धा एंजॉय करतो... असं म्हणतात, की प्रसिद्धी मिळायला लागल्यावर काही गोष्टी वहावत जातात, पण ही प्रसिद्धी कधीच तुझ्या दर्जाच्या आड आली नाही... प्रसिद्धी वाढली तरीही वहावत न जाताही खूप काही करता येतं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे... आणि यामुळेच तर एक महत्त्वाचं कॅरॅक्टर काही वर्षांपासून शोमध्ये नसताना आणि काही कॅरॅक्टर्स नवीन आली असतानाही तू तुफान सुरू आहेस... आजही तुझे नवीन एपिसोड्स तितकेच एंटरटेनिंग असतात...अर्थात, काहीही झालं, तरी 'ओल्ड इज गोल्ड' असं म्हणतात, त्यामुळे तुझ्या नवीन एपिसोड्सपेक्षा तुझ्या जून्या एपिसोड्सना आमचा जास्त सॉफ्ट कॉर्नर आहे हेदेखील तितकंच सत्य आहे, आणि ते तुलादेखील माहिती आहेच...
तू तुझ्या चाहत्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवतोस, ती म्हणजे हसणं... आजही तुझा कोणताही, विशेषत: जूना एपिसोड पाहिला, की सगळं टेन्शन निघून जातं...तुझे एपिसोड्स बघून कठीण काळातून जाणारेही हसलेयत...तुझ्या एपिसोड्सची खासियत म्हणजे काही एपिसोड्स सारखे सारखे बघून पाठ झाले असले, तरीही ते परत पहायचा कंटाळा येत नाही... आता वेबसिरीज, विविध मुव्हीज, सोशल मिडीयामुळे एंटरटेनमेंट साठी अनेक गोष्टी आहेत, पण आम्ही शाळेत असतानापासून आजतागायत तूच आमचा एंटरटेनर बनलायस... जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा तू होतास वगैरे म्हणतात ना, अगदी तसाच... आजही माझ्या ओळखीतले काहीजण 'काय यार अजून ही मालिका बघायला तुला काय मजा येते', 'इतकं काय आहे यार त्या सिरीयल मध्ये', 'क्रिंज आहे यार' असं म्हणतात (असं म्हणणाऱ्यांची संख्या अगदीच निग्लीजिबल आहे, कारण तुझ्या चाहत्यांची संख्याच इतकी प्रचंड आहे, की त्यांच्यापूढे ज्यांना तू थोडासा बोअरिंग वाटतोस त्यांची संख्या काहीच नाहीय), आणि कोणीही काहीही म्हटलं, तरी मला त्याचा काहीच फरक पडत नाही, कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते, आणि माझ्यासाठी म्हणशील, तर असली मजा तो सिर्फ और सिर्फ तेरी बजह से ही आता है...!
आम्हाला हसणं शिकविण्यासाठी, आमचा एंटरटेनर बनण्यासाठी खूप खूप थॅंक्यू... अजून खूप काही आहे लिहिण्यासारखं, पण तूर्तास थांबवते, कारण आता मला टीव्ही लावून टीव्हीवर तुझाच चोको मोको चॉकलेटवाला एपिसोड बघायचाय... तुझे असेच अनेक अनेक एपिसोड्स पूर्ण होत रहावेत, तुझे खूप सारे वाढदिवस व्हावेत... आणि तू सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करत रहावेस याच शुभेच्छा...
चलो, तो आज तुम्हे चौदा साल पूरे हुए है, उसकी खुशी में गरबा हो जाये...?
फक्त तुझीच,
सबसे बडी फॅन...❤️
-केतकी शैलेंद्र मोडक.
Happy birthday ❤️❤️ reminding every episode
ReplyDeleteमजा आ गया😂😂😂
ReplyDeleteNice✨
ReplyDelete