१५ जून... शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी...❤️
'कुछ बाते हमारे दिल के कमरे की इतनी खिडकिया खोल देती है की हम दंग रह जाते है'... खरं आहे, आपल्या आयुष्यात काही गोष्टी, प्रसंग यांसोबतच अशा काही विशेष तारखा असतात, ज्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या असतात.. दरवर्षी ती तारीख आली रे आली, की आपण कितीही व्यस्त असलो, तरी त्या तारखेशी निगडीत जुन्या आठवणींमध्ये रमून जातो... या तारखा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतीलही, पण एक तारीख अशी आहे जी आठवली रे आठवली, की शाळेत गेलेला प्रत्येकजण जून्या आठवणींमध्ये हरवून जातो, आणि ही तारीख म्हणजे १५ जून....
१५ जून म्हटलं, की आठवते ती मे महिन्याची सुटी संपून सुरु झालेलं नवं शैक्षणिक वर्ष... नव्या इयत्तेचा पहिला दिवस... सगळ्या गोष्टी नवीन... नेमकं शाळेत जायच्या वेळेला पडलेला पाऊस... दरवळणारा मातीचा सुगंध... पाऊस असूनही खूप दिवसांनी शाळेत जाण्याचा उत्साह... प्रत्येक १५ जूनच्या दिवशी आम्हाला माहिती असायचं; की आम्ही एक इयत्ता पुढे गेलोय, अभ्यास वाढणार आहे, काठीण्यपातळी वाढणार आहे... पण आम्हाला त्याचं कधीच टेन्शन नसायचं...१५ जून या दिवसामुळेच आम्हाला नव्या आव्हानांची सुरुवात किती सुंदर असू शकते याचा प्रत्येकवेळी अनुभव आलाय... या तारखेशी आमचा कनेक्ट इतका होता, की कधीतरी १५ जून ला रविवार असला, तर शाळा इतर तारखेला सुरु व्हायची, पण आम्ही मात्र चुकून '१५ जून ला भेटूया नव्या वर्गात' असंच एकमेकांना म्हणायचो...
...शाळेत असताना आतासारखी विकेंडची पाहिलेली वाट, किंवा गुरुवार शुक्रवार लीव्ह घेऊन अनुभवलेला लॉंग विकेंड वगैरे या कोणत्याच गोष्टी नव्हत्या... आमची एकमेव हक्काची सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी. खूप दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर वार्षिक परीक्षा संपायची, बरेचदा वार्षिक परीक्षेचा निकाल एक मे ला लागायचा. प्रगतीपत्रक वगैरे वाटून झाल्यानंतर 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु होईल' अशी सूचना आम्हाला मिळायची आणि '१५ जून' ला नव्या वर्गात भेटूया असं म्हणून उन्हाळी सुट्टीत मजा करायला आम्ही सर्वजण गावी पळायचो...
सुरुवातीचे काही दिवस शाळेची, वर्गाची, मित्रमैत्रिणींची आठवणही न काढता धमालमस्ती करून व्हायची... त्यावेळी 'आपण किती मजामस्ती करतोय' हे एकमेकांना दाखवायला सोशल मिडीया नव्हतं वा व्हॉट्सॲप स्टोरीज नव्हत्या... एकमेकांशी चॅटिंग करायचीही सुविधा नव्हती... कधीतरी एखाद्या मित्रमैत्रिणीचा गावातल्या लॅंडलाईनवर फोन यायचा, आणि मग मात्र शाळेची खूप आठवण यायची... कधी एकदा सुट्टी संपतेय आणि १५ जून येतोय याची आम्ही वाट पहायचो... आम्हीही कमाल होतो, शाळा सुरु असताना सुट्टी हवी असायची, आणि सुट्टी लागल्यावर १५ जूनचा दिवस हवा असायचा... असं म्हणतात, की एखादी गोष्ट आपल्याला खूप मनापासून हवी असते, पण एकदा का ती मिळाली रे मिळाली; की काही दिवसांनंतर त्या गोष्टीची मजा कमीकमी व्हायला लागते...धिस इज ह्यूमन टेंडन्सी... उन्हाळी सुट्टीचं पण असंच काहीसं व्हायचं...
मे महिना संपला आणि जूनची सुरुवात झाली, की हळूहळू आम्ही सगळे गावाहून घरी परतायचो, आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी खरेदीला सुरुवात व्हायची... नवीन युनिफॉर्म, नवी वह्यापुस्तकं, सिनिअर्सच्या घरी जाऊन मिळतील तितक्या विषयांचे व्यवसाय (वर्कबुक्स), नवं दप्तर, पावसाळ्यात शाळेच्या शूजऐवजी पावसाळी शूज चालत असल्यामुळे नव्या पावसाळी चप्पल, घरच्यांनी हट्ट मान्य केलाच; तर नवीन जॉमेट्रीबॉक्स... अशा अनेक गोष्टींची खरेदी व्हायची... खरेदी करून आल्याआल्या नव्या वह्यापुस्तकांचा वास मनात साठवून त्यांना खाकी कव्हर्स घालणं... वह्यापुस्तकांवर नावं घालणं.. खाकी कव्हरवर नावाचे स्टिकर्स लावणं... समाजशास्त्राच्या एकाच वहीत इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्रासाठी तीन भाग करणं या सगळ्या गोष्टी अगदी 'शास्त्र असल्यासारख्या' पार पाडल्या जायच्या. हे सगळं झालं, की आम्ही मित्रमैत्रिणींना फोन करून किंवा भेटून कोणता विषयाला कोणते शिक्षक येतील...नवा वर्ग कोणत्या मजल्यावर असेल... कोणाच्या शेजारी बसायचं... कोणता बेंच पकडायचा याची चर्चा करायचो... खरेदीपासून ते या सगळ्या चर्चांपर्यंत दिवस कधी संपायचे आणि १४ जून कधी उजाडायचा ते कळायचंच नाही... त्यादिवशी रात्री करायचं महत्त्वाचं काम म्हणजे दप्तर भरणं... शाळेचं वेळापत्रक आलं नसलं तरीही अंदाजाने सगळ्या विषयांची वह्यापुस्तकं, रफवही प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून मग बॅगेत भरायचो... नवीन खरेदी केलेली वह्यापुस्तकं पहिल्या दिवशी लगेच पावसामुळे भिजू नये हा या प्लॅस्टिकच्या पिशवीमागचा हेतू... त्या दिवशी 'उद्या फायनली शाळेत जाणार' या उत्साहात झोप कधी लागायची ते कळायचंदेखील नाही...
...अखेर १५ जून उजाडायचा. नेमका शाळेत जायच्या वेळेला चांगलाच पाऊस सुरु झालेला असायचा, परंतु शाळेत जाण्याच्या उत्साह इतका असायचा, की त्या पावसातही रेनकोट घालून किंवा छत्री घेऊन शाळेत जायला निघायचो... वह्यापुस्तकं प्लॅस्टिकच्या पिशवीत सुरक्षित असल्यामुळे त्यांची फारशी चिंता नसायची. शाळेत पोहोचल्यावर मित्रमैत्रीणी कुठे आहेत याकडे सगळं लक्ष लागलेलं असायचं. आवडीचा बेंच पकडायचा असल्यामुळे सगळे जरा लवकरच यायचे. मग शाळेत एकमेकांना भेटल्यावर परत एकदा कोणी कुठल्या बेंचवर बसायचंय याची उजळणी व्हायची... नव्या इयत्तेचा पहिला दिवस असल्यामुळे कोणीही गैरहजर नसायचं... घंटा वाजली की वर्गात शिरल्यावर वर्ग, बेंचेस पाहून अंगात नवा उत्साह संचारायचा... आवडीचा बेंच पकडणं वगैरे झालं, की कधी एकदा प्रार्थना होतेय याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं, कारण सुट्टीचे अनेक दिवस शाळेची प्रार्थना ऐकलेलीच नसायची... प्रार्थना झाली, की मग वर्गशिक्षक वर्गात येईपर्यंत एकमेकांच्या बेंचवर जाऊन थोड्या गप्पा मारणं सुरु असायचं... वर्गशिक्षक आल्यावर वर्षाचं वेळापत्रक, कोणी नवीन दाखल झालं असेल तर त्या विद्यार्थ्याची ओळख, कोणता विषय कोणते शिक्षक शिकवतील हे सगळं सांगायचे... पहिला दिवस असल्यामुळे नावानीशी हजेरी व्हायची. 'आपापले हजेरी क्रमांक लक्षात ठेवा' या वर्गशिक्षकांच्या सूचनेचं पालन करून आम्ही सर्व आपापले हजेरी क्रमांक लिहून ठेवायचो... पहिला तास संपला, की वेळापत्रकाप्रमाणे पुढचे तास व्हायचे... या दिवसाचं आणखीन एक वेगळेपण होतं... पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी फक्त विषयांची तोंडओळख होत असे. कोणीच विषय शिकवायला सुरुवात करायचे नाही, आणि त्यामुळे गृहपाठ देखील मिळायचा नाही... काही तासिकांनंतर झालेल्या मधल्या सुट्टीत अनेक दिवसांनंतर मिळालेली शाळेच्या पोषण आहारातील खिचडी, एकमेकांसोबत शेअर केलेले डबे, खेळलेले खेळ, मारलेल्या गप्पा यांमध्ये वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही... मधल्या सुट्टीनंतर उरलेले तास व्हायचे. त्या दिवशीच्या प्रत्येक तासिकेत 'आज पहिला दिवस असल्यामुळे उद्यापासून आपण विषय शिकण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत' असं सांगितलेलं असायचं... शाळा कधी सुटायची कळायचंच नाही, पण खूप मजा यायची... १५ जून आनंदात संपलेला असायचा. मग दूसऱ्या दिवशीपासून हळूहळू विषय शिकवण्यास सुरुवात व्हायची, गृहपाठ मिळायचा, नव्याची नवलाई म्हणतात तसं सुरुवातीचे काही दिवस 'खास १५ जूनसाठी खरेदी केलेल्या' वस्तूंचं अप्रूप वाटायचं, पण नंतर मात्र अभ्यास, गृहपाठ, खूप पाऊस पडल्यामुळे शाळेला अचानक मिळालेली सुट्टी किंवा पावसाळ्यात आजारी पडल्यामुळे बुडलेली शाळा, चाचणी परीक्षा या सगळ्या चक्रात ही नवलाई कधी संपायची ते कळायचंही नाही... हळूहळू सहामाही, वार्षिक परीक्षा, निकाल, 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून ला सुरु होईल' ही सूचना, आणि काही दिवस उन्हाळी सुट्टीत धमाल केल्यानंतर '१५ जूनची तितक्याच आतुरतेने पाहिलेली वाट' हे चक्र तसंच सुरु रहायचं... त्यावेळी आजच्यासारखं ओव्हरथिंकींग करायची सवयच कुठे होती हो? त्यामुळे हे चक्र कधीतरी थांबणार आहे, आणि कधीतरी १५ जून ही आपल्यासाठी एक नॉस्टॅल्जिया देणारी तारीख होणार आहे याची आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती...
नववी झाली, आणि नववीच्या निकालाच्या दिवशी 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु होईल' ही सूचनाच आम्हाला मिळाली नाही; कारण दहावी असल्यामुळे मे महिन्यापासूनच आमचे वर्ग सुरु होणार होते... त्यादिवशी आम्हाला कळलं, की आता आपल्याला परत कधीच १५ जून अनुभवता येणार नाही... 'शाळा संपलीये, आता उरलंय दहावी नावाचं फक्त भयाण वर्ष' ही एका कादंबरीत वाचलेली ओळ आम्ही त्यादिवशी प्रकर्षाने अनुभवली होती...
दहावीनंतर अकरावी-बारावी, महाविद्यालय, पुढे नोकरी या सगळ्यात १५ जून ची आतुरतेने पाहिलेली वाट, ती खरेदी, आपण हाच बेंच पकडूया अशी निरागसपणे केलेली चर्चा, या गोष्टी हरवल्या... पण १५ जून ही तारीख मात्र मनात कायमची कोरली गेली... आजही १५ जूनच्या दिवशी कितीही व्यस्त असलो वा आपल्या बंद क्युबिकल मध्ये एसीत बसून काम करत असलो, तरीही लहानपणचा उत्साह, मुसळधार पाऊस, चिखल असूनही मित्रमैत्रिणींना आणि शाळेला भेटण्याची निरागस ओढ... पावसापासून वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेली वह्यापुस्तकं... अनेक दिवसांनंतर ऐकलेली शाळेची प्रार्थना... शाळेत मिळणाऱ्या खिचडीची चव या सर्व गोष्टी आठवतात...
आजही परत एकदा 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु होईल' अशी सूचना मिळावी, १५ जून यावा, तशीच खरेदी करावी, पुन्हा एकदा शाळेत जावं, मनापासून प्रार्थना म्हणावी, 'ॲप्रेजल आणि क्रेडिट्स' साठी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी बेंच पकडण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी, सगळ्या तासिका अनुभवाव्यात; असं नेहमी वाटतं, पण 'आपल्याकडे अजूनतरी टाईम मशीन आलेलं नाहीये' असं समजावत स्वतःला भानावर आणावं लागतं, आणि एकच वाक्य म्हणावसं वाटतं, 'इन सर्च ऑफ गोल्ड, वी लॉस्ट दि डायमंड'...
-केतकी मोडक
खूप छान!
ReplyDeleteMast
ReplyDelete