प्रिय चॉकलेट...


त्यादिवशी एका मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'चॉकलेट कब देगी' असं आपसूकच तोंडातून निघालं... याआधीही अनेकदा 'तुला काय गिफ्ट देऊ' असं कोणी विचारल्यावर 'चॉकलेट द्या' असं मी म्हटलंय (हो अगदी अजूनही म्हणते)...कोणा लहान मुलाच्या हातातलं चॉकलेट पाहून 'काश ये चॉकलेट मेरे हाथ आता' असंही मला या वयातदेखील (माझं वय इतकं पण मोठं नाहीये म्हणा...🙊) वाटून गेलंय...यांसारखे अनेक अनुभव आल्यामुळे मी स्वत:ला 'चॉकलेटप्रेमी' म्हणवते (ये तौफा हमने खुदको दिया है टाईप्स...😂) अर्थात, आसपासच्या शंभर लोकांचा सर्व्हे केला; तर त्यातली कमीतकमी नव्वद लोकं तरी कन्फर्म चॉकलेटवेडी सापडतील... आपल्या आजूबाजूलाच इतकी चॉकलेटवेड्यांची संख्या असल्यामुळे, आपणापैकी अनेकांनी मी वर म्हटलेले अनुभव कधी ना कधीतरी नक्कीच घेतले असतील, आणि स्वत:च स्वत:ला 'चॉकलेटप्रेमी' हा किताबही दिला असेल...

नाईंटीज किड्स असोत, वा इतर कोणीही.. सर्वांचं लहानपणापासूनचं पहिलं प्रेम म्हणजे चॉकलेट असतं...आणि आम्हा नाईंटीज किड्स नी तर जुन्या कव्हरातल्या कॉफीबाईट किंवा पांढऱ्या कव्हरातल्या रावळगाव पासून ते आताची अमुल डार्क चॉकलेट्स किंवा फाईव्ह स्टार थ्रीडी पर्यंतचं ट्रांझिशन अनुभवलेलं असल्याने आमच्याकडे चॉकलेटसंबंधी अनेक गोड आठवणी आहेत... आमच्या या आठवणी गोड असण्यामागचं आणखीन एक कारण, म्हणजे संयम... आम्ही लहान असतानापासून चॉकलेट खात आलो असलो, तरीही केवळ 'आवडतं' म्हणून आमच्यासाठी रोज चॉकलेट घेऊन कोणी आलं नाही, वा आमचं रडणं थांबवण्यासाठीही आम्हाला कोणी चॉकलेट दिलं नाही... आमच्यासाठी चॉकलेट ही दररोज खायला मिळत नसणारी गोष्ट असल्यामुळे चॉकलेटवेडे असूनही आमचं चॉकलेटवेड संयमात होतं, आणि त्यामुळेच आमच्याकडे चॉकलेटसंबंधी गोड आठवणीच अधिक आहेत...

माझ्या चॉकलेटप्रेमाची सुरुवात झाली ती माझ्या सगळ्या आजोबांमुळे... लहान असताना ते अध्येमध्ये माझ्यासाठी जेम्सचं लहानसं पाकीट म्हणा, पेपरमिंट म्हणा, वा साधं चॉकलेट म्हणा; काहीतरी घेऊन यायचेच...आमच्या बिल्डिंगमध्ये खाली रहाणारे काका सुद्धा आम्हा सगळ्या लहान मुलांसाठी एक वेगळंच पांढऱ्या रंगाचं चॉकलेट आणायचे.. (त्या चॉकलेटचा आकार बर्फाच्या खड्याइतका आणि रंग पांढराशुभ्र असल्यामुळे आम्ही त्याला बर्फाचं चॉकलेट म्हणायचो...). या सगळ्या चॉकलेट्स व्यतिरिक्त हाजमोला, मॅंगोबाईट, कॉफीबाईट, रावळगाव, पॉपिन्स, रावळगावची रंगीबेरंगी चॉकलेट्स (विशेषत: गुलाबी रंगाची), हॉल्स ही चॉकलेट्स आमची हक्काची सवंगडी होतीच... आमच्या शाळेच्या इकडे 'बोरकूट' नावाचा काहीतरी प्रकार मिळायचा, तो सुद्धा आम्ही घरच्यांची परवानगी घेऊन विकत घ्यायचो, आणि घरी आल्यावर मगच खायचो, उन्हाळ्यात रसना सरबत करायच्या निमित्ताने रसना सुद्धा आम्ही तोंडात टाकायचो...(हो आम्ही रसना पावडर सुद्धा चॉकलेट म्हणूनच खाल्लीये...)

तेव्हा हाजमोला, हॉल्स वगैरे आमचे हक्काचे सवंगडी असले, तरीही, त्यावेळी मोबाईल फोनच्या आकारात मिळणाऱ्या जेली चॉकलेटची जाम क्रेझ आल्यामुळे आम्ही जुन्या सवंगड्यांना सोडून या नव्या सवंगड्याच्या मागे लागलो होतो...आम्हा मित्रमैत्रिणींना एकदा तरी ते चॉकलेट खावं अशी खूप इच्छा झाली... जेली खाल्ल्यामुळे पोटात दुखतं असं वगैरे घरच्यांनी सांगूनही आम्ही सगळ्या मुलांनी जेली चॉकलेट वाला मोबाईल हवा असा हट्ट धरला होता... आणि शेवटी तो मिळाल्यावर खुश होऊन लगेच तो संपवूनही टाकला होता (दुसऱ्या दिवशी बऱ्याच जणांची पोटं दुखली होती), त्यामुळे परत आम्ही आमच्या नेहमीच्या हक्काच्या सवंगड्यांकडे, अर्थात हाजमोला वगैरेकडे वळलो होतो... 

जेलीनंतर कधीतरी 'डेरीमिल्क' नावाच्या प्रकाराची आमची ओळख झाली (हो तेव्हा Dairymilk ला 'डेअरीमिल्क' नाही तर 'डेरीमिल्क' असं म्हणतात हाच आमचा समज होता), पण डेरीमिल्क मध्ये अळ्या असतात असा आम्हा सर्व मुलांचा समज झाला होता... (इतका, की एकदा एका काकांनी खाऊ म्हणून माझ्यासाठी डेरीमिल्क आणली असताना मी त्यांना 'काका, डेरीमिल्क मध्ये अळ्या असतात, त्यामुळे डेरीमिल्क खायचं नाही असं बाईंनी आम्हाला सांगितलंय' असं अभिमानाने सांगितल्याचं सुद्धा मला चांगलंच आठवतंय). आणि अर्थात मोबाईलमधल्या जेली प्रकरणानंतर रिस्क कोण घेणार, असा आम्हा सर्व मित्रमैत्रीणींचा निर्णय झाला होता... त्यामुळे पहिल्यांदा डेरीमिल्क कधी खाल्लं हे मला आठवत नसलं, तरीही पहिल्यांदा डेरीमिल्क खाताना ते आईला दाखवून त्याचं पूर्ण डायसेक्शन करून 'अळ्या नाहीत' हे कन्फर्म केल्यावर मगच खाल्ल्याचा प्रसंग माझ्या अजून लक्षात आहे... 

तेव्हा मावशी आणि आणखीन एका काकांमुळे परदेशी चॉकलेट्सशी माझी जस्ट ओळख झाली होती...मी लहान असल्यामुळे जी चॉकलेट्स लांब, वेगवेगळ्या आकाराची किंवा लाडूसारखी गोल असतात, ती परदेशी चॉकलेट्स असा माझा पक्का समज झाला होता...(लहानपणी मला खजूर आवडायचा नाही, पण माझ्या या बाळबोध समजाचा फायदा घेऊन आईने खजूराचा काहीतरी पौष्टिक पदार्थ लाडूच्या आकारात करून परदेशी चॉकलेट म्हणून माझ्या गळी उतरवला होता...)

हळूहळू बोरकुट वगैरे प्रकार मिळायचे बंद झाले, पण मग आमचस्का, जलजीरा पावडर (हो आम्ही जलजीरा पावडरही चॉकलेट म्हणूनच खाल्लीये) यांच्याकडे वळलो...चिंगम वगैरे प्रकाराशी ओळख झाली होती, पण ते खाल्ल्यावर आतड्याला चिकटतं या भीतीमुळे आम्ही त्याच्यापासून लांबच राहिलो...(शाळेत एखादा कोणी चिंगमचा फुगा फुगवताना दिसलाच, तर बाकी सर्व 'आतड्याला चिकटेल बघ तुझ्या' असं म्हणून समोरच्याला घाबरवायचे सुद्धा...) मेंटॉस पण चिंगम असते असा आमचा कोणीतरी समज (की गैरसमज!) करून दिला होता (हो कारण तेव्हा गैरसमज करायला व्हॉट्सॲप फॉर्वर्ड्स नव्हते...😜), पण तो वेळीच दूर झाला, आणि आम्ही मेंटॉस मध्येही रमायला लागलो...  

कोणत्यातरी एका मुव्हीमध्ये एक वाक्यं होतं, 'लहान असताना किती सोपं होतं, नाही...?'.. अगदी याच वाक्याप्रमाणे कोणतीही गोड किंवा छान लागणारी गोष्ट आमच्यासाठी 'चॉकलेट' होतं...(अगदी ती तापावर दिलेली केशरी रंगाची ऑरेंज फ्लेवरवाली गोळी असो, वा 'चॉकलेट' म्हणून अधाशासारख्या खाल्लेल्या एका विशिष्ट आकाराच्या डबीत मिळणाऱ्या कॅल्शियम वाढवण्यासाठीच्या गोळ्या असोत, अर्थात या गोळ्यांमुळे कॅल्शियम कदाचित वाढलं नसेलंही, पण आमच्या मनातल्या चॉकलेटसंबंधी गोड आठवणी मात्र नक्कीच वाढल्या...). आमच्या चॉकलेटची खरेदीही अगदी सोपी होती... खाली खेळायला जाण्याआधी चॉकलेट खाण्यासाठी घरून परवानगी काढायची, मग घरून एक किंवा दोन रुपये घेऊन खाली जायचं, आणि त्यात जी आवडतील ती चॉकलेट्स घेऊन सर्वांसोबत वाटून मग खायची... (इक्लेयर्स किंवा मेलोडी घ्यायला गेलं, तर एक रुपयात एकच चॉकलेट येत असल्यामुळे आम्हा सर्वांचा कल इतर चॉकलेट्सकडे जास्त असायचा...). शाळेत कोणाचाही वाढदिवस असताना चॉकलेट्स वाटण्याची पद्धत होती... बरेचजण कॉफीबाईट किंवा अल्पेनलिबी वाटायचे... पण अगदी क्वचित कोणी मेलोडी किंवा इक्लेयर्स वगैरे वाटलं, तर त्याच्याकडे 'बडा आदमी है' अशा नजरेने आम्ही पहायचो...(कारण, बाकी चॉकलेट्सपेक्षा महाग असल्यामुळे मेलोडी, इक्लेयर्स म्हणजे सगळ्यात महाग असा आम्हा सर्वांचाच साधासोपा समज होता...)

हळूहळू मोठे होत गेलो, आणि किटकॅट, फाईव्ह स्टार, पर्क, मंच यामध्ये रमायला लागलो...खाली जाऊन चॉकलेट घेणंही कमी झालं...पुढे ओरीओ फ्लेवर पासून अगदी रेड वेल्वेट फ्लेवर आणि डेरी मिल्क सिल्क ते फरेरो रोशर पर्यंत सगळ्या चॉकलेट्सशी आमची ओळख झाली...वेगवेगळे कोको पर्सेंटेज असलेली बिटर चॉकलेट्सही शुगर कमी म्हणून आवडीने खाऊ लागलो... या वेगवेगळ्या चॉकलेट्सच्या गर्दीत मात्र आमच्या लहानपणी सगळीकडे मिळणारी आमचस्का म्हणा, वा नावंदेखील माहित नसलेली रंगीबेरंगी चॉकलेट्स म्हणा,  हरवूनच गेली, आणि केवळ आम्हा नाईंटीज किड्सच्या आठवणींत राहिली.... किसमी चॉकलेट असो, वा पिंक अल्पेनलिबी असो; लहान असताना मिळायची तितकी नाही, पण आजही खायला मिळतात आणि आजही या चॉकलेट्सच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत हे पाहून खूप भारी वाटतं...(मग इंजिनिअरिंग ला असताना मी कॉलेजला येते त्या रस्त्यावरील एका दुकानात गुलाबी अल्पेनलिबी मिळतात हे कळल्यावर 'कुछ भी कर लेकिन मेरे लिये प्लीज दस बीस पिंक अल्पेनलिबी लेके आ, मेरे घर के पास मिलते ही नहीं है यार' असं म्हणून हक्काने मागणारी, आणि मी अल्पेनलिबी आणून दिल्यावर खूश झालेली मैत्रीण असो, वा पॉपिन्स खाव्याशा वाटतायत असं म्हणणारी ऑफिस कलिग असो)...

आतादेखील मॉल मध्ये गेल्यावर दिसणाऱ्या डेअरी मिल्क, सिल्क, बिटर चॉकलेट्स च्या गराड्यात छान वाटत असलं, ही चॉकलेट्स आम्ही खातही असलो; तरी लहानपणी घरच्यांची परवानगी घेऊन हाती येणाऱ्या एक किंवा दोन रुपयांत खालच्या दुकानात जाऊन तिकडच्या सगळ्या बरण्या बघून घेतलेली आणि सर्वांसोबत शेअर करून खाल्लेल्या पन्नास पैशातल्या चॉकलेट्सची वा शाळेच्या स्पोर्ट्स डे ला सगळ्यांत वाटून खाल्लेल्या 'लिमलेटच्या गोळ्यांची' मजा मात्र या मॉलमधल्या चॉकलेट्समध्ये निश्चितच नाही...

आमचं लहानपण छान करण्यासोबतच, शेअरिंग इज केअरिंग असो, वा संयमाचं महत्त्व असो... अशा अनेक गोष्टी शिकवण्यामागे चॉकलेट या गोष्टीचादेखील निश्चितच हात आहे...आम्हा सर्वांचं, विशेषत: नाईंटीज किड्सचं लहानपण तुमच्याइतकच गोड केल्याबद्दल थॅंक्यू चॉकलेट्स...!

तुमच्याही चॉकलेटसंबंधी अशाच काही गोड आठवणी असतील, तर नक्की कमेंट करा...!


Comments

  1. आमच्या इथे सोरट हा प्रकार मिळायचा. त्यात 2 रुपयात एक चॉकलेट किंवा बडीशेप मिळायची. तो कागद फोडला की त्यात आपल्याला लहान प्लास्टिकची सायकल किंवा खेळणी मिळायची. बऱ्याचदा १ किंवा दोन रुपये मिळायचे. त्यावर पैसे लागले अस लिहिलं जायचं.


    मला डेअरी मिल्क इतकी आवडायची की समोर दिसली की क्षणार्धात फस्त करायचो. पुढे ठाण्याच्या कॅडबरी कंपनी जवळ राहायला गेलो. तिथे रोज कॅडबरी चा वास यायचा. रोज वास घेऊन जिभेला पाणी सुटायचं.


    खूप छान लेख. आम्हा ९० किड्सचे दिवस आठवले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️