आठवणीतले मार्च-एप्रिल...

'कुछ बाते हमारे यादों के कमरे की इतनी खिडकिया खोल देती है, की हम दंग रह जाते है!' ये जवानी है दिवानी मधलं हे वाक्य आपल्या सर्वांना, विशेषत: नाइंटीज किड्सना रिलेटेबल वाटतं. काही गोष्टी आता अनुभवायला मिळत नसल्या, तरीही एका ठराविक वेळी मात्र त्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मार्च-एप्रिल महिने त्यांपैकीच एक. होतं काय, की मार्च, एप्रिल महिने उजाडले, की सगळीकडे परीक्षामय वातावरण दिसून येतं, आणि आठवते ती शाळेतली वार्षिक परीक्षा. 

'परीक्षा' हा तमाम विद्यार्थ्यांच्या डोक्याला शॉट लावणारा शब्द. शाळेत असताना परीक्षेचे दिवस आले, की मस्त सुरु असलेल्या लाईफ मध्ये अचानक कोणीतरी ब्रेक मारलाय असं वाटायचं. शाळेत असताना, कॉलेजमध्ये जास्त परीक्षा घेत नाहीत, सहामाही, वार्षिक असं काहीच नसतं असा आम्हा सर्वांचाच समज होता. त्यामुळे मग उगाचच आजूबाजूला असलेल्या कॉलेज गोइंग मुलांचा हेवा वाटायचा. अर्थात कॉलेजला गेल्यावर तो समज इतका खोडून निघाला की, 'यार शाळेत असताना किती मस्त होतं ना' असं वाटायला लागलं तो भाग वेगळाच. 

तर नेहमीप्रमाणेच मार्च, एप्रिल म्हटला की सगळीकडे परीक्षांच्या चर्चा सुरु व्ह्यायच्या. शाळेत असताना आमची वार्षिक परीक्षा बरेचदा एक एप्रिल ला सुरु व्हायची, आणि साधारण आठवड्याभरात संपायची (त्यामुळे कोणतीही परीक्षा फक्त आठवडाभर चालते, असा माझा ग्रह झाला होता). 

वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक आलं नसलं, तरी मार्च महिना सुरु झाला, की आम्हा सर्वांनाच 'आता अभ्यास सुरु केला पाहिजे' असं अचानक वाटायचं. कारण, मार्च सुरु झाला, की दहावीच्या परीक्षा सुरु व्ह्यायच्या आणि सगळीकडे दहावी आणि बोर्ड याच चर्चा ऐकायला मिळायच्या. आमची शाळा सुद्धा दहावीचं सेंटर असल्यामुळे आम्हा इतर विद्यार्थ्यांची शाळा दहावीचा पेपर झाल्यावर दुपारी भरायची. त्यामुळे शाळेत जाताना पेपर देऊन घरी चाललेले विद्यार्थी, काही हातात प्रश्नपत्रिका घेऊन टेन्शनमध्ये काहीतरी चर्चा करणारे ग्रूप्स अशा सगळ्या गोष्टी दिसायच्या. ते बघताबघता 'यार दहावीच्या परीक्षेला बोर्ड का म्हणतात? दहावीची वार्षिक परीक्षा असं का म्हणत नाहीत?, ही मुलंमुली युनिफॉर्म मध्ये का नाही येत पेपर द्यायला?' असे अनेक प्रश्न आम्हाला पडायचे. पण या प्रश्नांसोबतच 'आता आपणही अभ्यास करायला सुरुवात करायला हवी' यावर आमचं एकमत व्हायचं.

अभ्यास करावा यावर एकमत झाल्यानंतर हळूहळू अभ्यासाला सुरुवात व्ह्यायची. शाळेत असताना शिकवलेलं सगळच कळत असल्यामुळे आतासारखं युट्यूब चॅनल वगैरेची मदत घेऊन शिकायची, आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची कधी वेळच आली नाही. तेव्हा अभ्यास करताना मध्येच इंस्टा, मीम्स स्क्रोल करणं, एखाद्या मित्राला 'यार, कितना हुआ पढके' असं विचारणं, एखादं चॅप्टर ऑप्शनला टाकणं, अभ्यास करायचा राहिलाय म्हणून रात्रभर जागून तो पूर्ण करणं आणि मग 'एका रात्रीत अभ्यास केला' अशी शायनिंग मारणं या कोणत्याच गोष्टी ट्रेंडिंग नव्हत्या. 'आधीच सगळा अभ्यास पूर्ण करून परीक्षेच्या आधी रिव्हिजन' असं आम्हा सर्वांचं फिक्स गणित ठरलेलं होतं. शाळेतले विषय पण एकदम भारी होते. म्हणजे, काही विषय काहींना कठीण वाटायचे, पण 'यात फक्त पास व्हायचंय' इतका अंत कोणत्याच विषयाने कोणाचाच बघितला नाही. अभ्यास करणं म्हणजे धड्यांचं वाचन करणं, गणितं सोडवणं, प्रमेय लक्षात ठेवणं, आणि कविता पाठ करणं इतकंच मला माहिती होतं. 

शाळेत असताना प्रत्येक परीक्षेचं एक ठरलेलं वेळापत्रक असायचं. म्हणजे प्रत्येक परीक्षेची सुरुवात व्हायची ती मराठीने. मराठी मला एखाद्या जवळच्या मित्रमैत्रीणीसारखा वाटायचा, अजूनही वाटतो. म्हणजे कसं, आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत असल्यावर वेळेचं भान उरत नाही, तसंच मराठीचे धडे, कविता वाचताना, समजून घेताना वेळ कसा निघून जायचा ते कळायचंच नाही. निबंधाचे वेगवेगळे विषय, संदर्भ स्पष्ट करा मध्ये एकदम मनापासून लिहिलेला कवितेच्या ओळींचा अर्थ, आणि स्वत:च्या भाषेत अगदी मनापासून लिहिलेलं एखादं उत्तर या सर्वांमुळे मराठीच्या पेपरचे तीन तास म्हणजे माझ्यासाठी तीन तासाच्या एखाद्या फिल्मपेक्षा सुद्धा जास्त इंटरेस्टिंग असायचे. मग यायचे ते हिंदी, संस्कृत, इंग्रजी. या विषयांत मराठीसारखे खूप सारे धडे, कविता किंवा एकदम भारी असे निबंध असं काहीच नसायचं, त्यामुळे या विषयांशी माझं एकदम फॉर्मल रिलेशन होतं. अगदी जेवढ्यास तेवढं. त्यामुळे जो प्रश्न विचारलाय, त्याला मोजून-मापून उत्तर देणं इतकाच माझा या विषयांशी संबंध होता. (अर्थात, तेव्हा इंग्रजीची जास्त सवय नसल्यामुळे कल्पनाशक्ती लढवून एखाद्या प्रश्नाचं सखोल उत्तर देणं, तेही ग्रामॅटिकली करेक्ट मला तरी जमलं नसतं, त्यामुळे हे फॉर्मल रिलेशन च बरं होतं.) फॉर्मल रिलेशन असलं, तरी हे तिनही पेपर आम्हा सर्वांनाच आवडायचे. 

या पेपर्सनंतर 'रियल गॅंगस्टर्स कम इन' म्हणत एन्ट्री मारायचे ते म्हणजे मॅथ्स आणि सायन्स हे विषय. कधीकधी आवडायचे, कधीकधी मात्र जाम बोअर व्ह्यायचं. हे पेपर झाले, की समाजशास्त्राचा नंबर लागायचा. बऱ्याचजणांना समाजशास्त्र बोअर वाटायचं, पण मला मात्र समाजशास्त्राचा कधीच कंटाळा आला नाही (त्यामुळे तेव्हा मोठेपणी मी आयएएस वगैरे होणार की काय असं मला उगाचच वाटायचं). समाज चा पेपर झाला, की नंतरचे कार्यानुभव, पीटी, ड्रॉइंग, व्यक्तिमत्त्व विकास वगैरेचे आमच्या भाषेत लिंबूटिंबू पेपर्स बाकी असायचे, त्यामुळे समाज चा पेपर झाला, की आम्ही सगळे 'परीक्षा संपली' असंच गृहीत धरायचो. 

अखेर हे लिंबूटिंबू पेपर्ससुद्धा संपायचे. शेवटच्या पेपरची शेवटचे बेल वाजली, की सगळ्या वर्गांतून मुलामुलींच्या ओरडण्याचा आवाज यायचा, आणि सगळेजण ओरडतच शाळेबाहेर पडायचे. मग आमची छोटीशी पार्टी व्हायची. म्हणजे आम्ही सगळे मित्रमैत्रिणी घरून दोन, तीन किंवा जास्तीत जास्त पाच रुपये घेऊन यायचो. मग त्या पैशांतून दोन रुपयाच्या रिंग्स, चॉकलेट, आणि पाच रुपये आणले असतील तर मग वडापाव, समोसापाव किंवा चायनीज भेळ खायचो. ही छोटीशी पार्टी संपली, की मग सुट्टीत काय करायचं, गावाला कधी जाणार, घरी जाऊन मस्त 'तारक मेहता...' बघूया अशा अनेक गप्पा मारत मारत आम्ही घरी पोहोचायचो. 

घरी गेल्यावर कपाटातली सगळी पुस्तकं बाहेर काढून कपाट रिकामं करणं हे माझं पहिलं काम असायचं. त्यानंतर मग मोर्चा वळायचा तो लायब्ररीतून आणलेल्या गोष्टीच्या पुस्तकांकडे. आणलेल्यातली अर्धी पुस्तकं वाचून संपेपर्यंत तो दिवस निघून जायचा, आणि दुसऱ्या दिवशीपासून प्रॉपर सुट्टीची सुरुवात व्हायची. मग सकाळपासून पेपरमधलं शब्दकोडं सोडव, उरलेली अर्धी गोष्टींची पुस्तकं वाचून संपव, सीडीवर पछाडलेला बघ (कारण तेव्हा मला तो एकच पिक्चर इतका आवडायचा, की प्रत्येक परीक्षेनंतर पछाडलेला चा एक शो व्हायचाच व्हायचा), रेडियो ऐक, आवडता विषय असेल तर रेडिओ जॉकीज ना फोनच कर (अनेक अटेम्प्टस नंतर फोन लागल्यावर जग जिंकल्याचा आनंद व्हायचा), संध्याकाळी खेळायलाच जा अशा अनेक गोष्टी सुरु व्हायच्या. एक मे ला परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंत हे सर्व उपद्व्याप सुरु असायचे. 

परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर मग 'जून मध्ये भेटूया' असं म्हणून  बरेचजण गावी जायचे. जूनचा पहिला आठवडा उजाडेपर्यंत हळूहळू एक एक जण परत यायचा. परीक्षा झाल्यावर जवळपास महिनाभर मजामस्ती केल्यामुळे सर्वांच्याच मजामस्ती चा 'कोटा' संपलेला असायचा. तरीही सुट्टीचे उरलेले दिवस दंगामस्ती करून, नवीन वह्यापुस्तकं, नवा वर्ग, नवे वर्गशिक्षक कोण असतील या सर्व गोष्टींवर चर्चा करून आम्ही सर्वच 'शाळा कधी सुरु होतेय' याची वाट पहायचो. अखेर परत शाळा सुरु व्हायची. नवीन वर्ग, नवी पुस्तकं, पावसाळ्यात कधीतरी अचानक मिळणारी सुट्टी, सहामाही परीक्षा असं करत करत परत मार्च महिना उजाडायचा, परत 'अभ्यास केला पाहिजे' असं म्हणत आम्ही अभ्यासाला लागायचो, परत तेच विषय, तशीच वार्षिक परीक्षा, आणि परीक्षा झाल्यावर तशीच मजामस्ती...!

दहावी झाली, आणि हळूहळू हे परीक्षेचं आणि अभ्यासाचं 'सेट' वेळापत्रकच हरवून गेलं. पुढे इंजिनिअरिंग घेतलं, आणि इंजिनिअरिंग च्या परीक्षांच्या एक्स्ट्रा हटके शेड्यूलमुळे 'एकेकाळी आमचंही परीक्षेचं सेट वेळापत्रक होतं' हे सुद्धा आम्ही विसरून गेलो, न संपलेला आणि न कळलेला पोर्शन, वेगवेगळे विचित्र आणि कठीण विषय, पासिंग मार्क्स तरी मिळतील का, केटी नको लागायला या सगळ्या विचारांत शाळेतल्या परीक्षांची मजा कधी कमी झाली आणि हळूहळू ऑफिसमधील परीक्षांपेक्षाही कठीण वाटणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ती कधी आणि कशी हरवली ते आमचं आम्हालाही कळलं नाही... 

पण तरीही मार्च, एप्रिल महिना आला की अजूनही शाळेतल्या तासिका, रस्त्यावर भेटणारी बोर्डाची, आमच्या लहानपणीच्या भाषेत सांगायचं, तर 'दहावीची वार्षिक परीक्षा' देऊन आलेली मुलंमुली, आमचं अभ्यासाचं प्लॅनिंग, शाळेतले छान छान विषय, सोशल मीडिया, नेटफ्लिक्स काहीच नसतानासुद्धा परीक्षा देऊन आल्यावर सुट्टीत केलेली स्वत:चीच इंटरटेनमेंट, कॉलेजमध्ये कधीतरी जंबोकिंग किंवा हॉटेल मध्ये जाऊन केलेल्या सो कॉल्ड पार्टीपेक्षा ती जास्तीत जास्त पाच रुपयांत केलेली छोटीशी पार्टी या सर्व गोष्टींची आवर्जून आठवण येते, आणि 'इन सर्च ऑफ गोल्ड, वी लॉस्ट दि डायमंड' या ओळीचा पुरेपूर अर्थ पटतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️