आठवणीतला प्रजासत्ताक दिन...
जानेवारी महिना सुरु झाला आणि वार्षिक स्नेहसंमेलन वगैरे सगळे कार्यक्रम झाले, की आम्ही सर्वजण
२६ जानेवारी कधी येतोय याची वाट बघत असायचो. यामागे अनेक कारणं होती... पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळेत नेहमी अतिशय उत्साहाने साजरे होणारे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे दिवस, आणि त्यासाठी काही दिवस आधीपासून सुरु होणारी तयारी, आमच्या शाळेच्या भव्य ग्राऊंडवर होणारी लेझिम प्रॅक्टिस... देशभक्तीपर गाण्यांची प्रॅक्टिस, या दोनही दिवशी आजी-माजी विद्यार्थ्यांनी भरून जाणारं आमच्या शाळेचं ग्राऊंड, प्रमुख पाहुण्यांची अर्थपूर्ण भाषणं आणि खूप काही...
या दोनही दिवशी महिने आणि ऋतू वेगळे असले, तरी आम्हा सर्वांच्या उत्साहाची लेव्हल मात्र सारखीच असायची. २६ जानेवारीच्या निमित्ताने शाळेतल्या प्रजासत्ताक दिनाची, त्यासाठी काही दिवस आधीपासून केलेल्या तयारीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही...
वार्षिक स्नेहसंमेलन झालं, की काही दिवसांनी शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु व्हायची... मग भाषणं करणारे, लेझिमसाठी, देशभक्तीपर गाण्यासाठी कोण कोण इच्छूक आहेत त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लगेचच आमच्या प्रॅक्टिसला सुरुवात व्हायची. प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिससोबत होणाऱ्या गमतीजमती, गाण्याची प्रॅक्टिस करताना अचानक कोणीतरी हसल्यामुळे झालेली मजामस्ती... भाषणाची तयारी करण्यासाठी लायब्ररीमधून विविध पुस्तकं घेऊन गोळा केलेली माहिती, लिहिलेलं आणि अनेक बदल करून फायनल केलेलं भाषण... प्रॅक्टिसमुळे नकळतच टिमवर्क, ग्रूपमध्ये काम केल्याने होणारे फायदे, एखादी गोष्ट जितकी परफेक्ट करता येईल तितकी करावी अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळत होत्या... प्रॅक्टिसच्या उत्साहामुळे जानेवारीच्या थंडीतसुद्धा शाळेला दांडी मारायचा विचार कधीच कोणाच्याही मनात यायचा नाही... हळूहळू प्रॅक्टिस झाल्यावर आम्ही २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तयार व्हायचो, भाषणदेखील पाठ व्हायचं... आणि सगळे कधी एकदा प्रजासत्ताक दिन येतोय याची वाट पहात असायचो...
२५ जानेवारीच्या रात्री न विसरता एक काम असायचं ते म्हणजे युनिफॉर्मला इस्त्री करणं... कोणी विसरू नये म्हणून सकाळी शाळेतच एकमेकांना 'उद्या युनिफॉर्म ला इस्त्री करायची आहे' अशी आठवणसुद्धा करून द्यायचो... खरं सांगायचं, तर त्यादिवशी युनिफॉर्मला केलेली इस्त्री जरा जास्तच कडक वाटायची... पंचवीस जानेवारीला रात्री झोपताना 'उद्या सकाळी लवकर उठवा' असं घरी सांगायची गरजच नव्हती, कारण उत्साहच इतका असायचा, की नेहमीपेक्षा आधीच आपोआप जाग यायची...तीसुद्धा अलार्मच्या आधीच...
युनिफॉर्मची कडक इस्त्री दिसावी यासाठी स्वेटरही न घालता शाळेत पोहोचल्यावर इतक्या थंडीतही अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुललेलं शाळेचं ग्राऊंड, पाहुण्यांची गर्दी पाहून अंगात वेगळाच उत्साह संचारायचा, इतक्या लोकांसमोर आपल्याला भाषण वगैरे करायचंय याचं टेन्शन यायचं... पण प्रॅक्टिस पक्की असल्यामुळे सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडायचा... कार्यक्रम झाल्यानंतर जमलेली गर्दी पाहून 'आपण इतक्या लोकांसमोर न घाबरता सादरीकरण केलं' याचा अभिमानही वाटायचा...या सर्वामुळे आमचा आत्मविश्वास वाढण्यात खूप मदत झाली हेदेखील तितकंच खरं आहे... कार्यक्रम छान झाल्यामुळे इतक्या दिवसांची प्रॅक्टिस सफल झाली याचा खूप आनंद झालेला असायचा, प्रमुख पाहुण्यांची भाषणं ऐकून ज्ञानातही भर पडलेली असायची... कार्यक्रम संपला, की लहान असल्यामुळे कार्यक्रमानंतर दिलं जाणारं इक्लेयर्स चॉकलेट आणि बिस्कीटपूड्याची आम्ही वाट बघत असायचो... सगळं झालं, की मग शाळेतून निघून थोड्या वेळाने घरी पोहोचायचो... तेव्हा ना मित्रमैत्रिणींसोबत काढलेले सेल्फी होते, ना गर्दीचे फोटोज, ना भाषण किंवा इतर सादरीकरण करतानाच्या व्हॉट्सॲप स्टोरीज...पण फोनमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज स्टोअर्ड नसले, तरी या आठवणी मात्र मनातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात नक्कीच स्टोअर्ड आहेत...
दहावी झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम कॉन्स्टन्ट असला, तरीसुद्धा ही पूर्वतयारी, २६ जानेवारीसाठी केलेलं भाषण या सगळ्या गोष्टी मात्र हरवून गेल्या... काल बाहेर असताना काही संवाद ऐकल्यावर प्रजासत्ताक दिनापेक्षा त्यादिवशी मिळणाऱ्या सुट्टीची जास्त चर्चा होतेय असं जाणवलं आणि वाईट वाटलं... यानिमित्ताने शाळेत असताना लहान असलो तरी प्रजासत्ताक दिनासाठी असलेला आम्हा सगळ्यांचा उत्साह, केलेली प्रॅक्टिस, इतक्या थंडीतही उत्साहाने पहाटे उठून कार्यक्रमासाठी शाळेत लावलेली हजेरी या सर्वांची आठवण आली, आणि 'इन सर्च ऑफ गोल्ड वी लॉस्ट दि डायमंड' या वाक्याचा अर्थ पूरेपूर पटला....
छान
ReplyDelete