रिझॉल्यूशन: मिशन वेटलॉस...
माझी एक जुनी सवय आहे. जुनं वर्ष संपून नवीन वर्ष लागणार असं जेव्हा जाणवतं, तेव्हा अचानक 'आपणसुद्धा नव्या वर्षात नवं काहीतरी करूया' असा विचार करून न्यू इयर रिझॉल्यूशन, अर्थात नवीन वर्षात नवीन संकल्प करण्याचं खूळ माझ्या डोक्यात शिरतं. पण, यातसुद्धा एक झोल आहे.. एकतर मला तारखा लक्षात रहात नाहीत.. म्हणजे 'आज कोणती तारीख आहे' असं जर कोणी मला विचारलं, तर व्हायवा मध्ये एक्स्टर्नलने कठीण प्रश्न विचारल्यावर जसं गोंधळून जायला व्हायचं, अगदी त्यापेक्षा जास्त गोंधळून 'थांबा, मी लॅपटॉप वर चेक करते' असं मी म्हणते... (थॅंक्स टू वर्क फ्रॉम होम...🙈)... तर, सांगायचा मुद्दा इतकाच होता, की (इंजिनिअरिंग करताना एक लहानसा मुद्दा डोक्यात असला तरी तो वाढवून पानभर उत्तर लिहायची सवय असल्यामुळे मुळ मुद्द्यावर यायला आजकाल जरा जास्त वेळ लागतो...😜) तारखा लक्षात रहात नसल्याने नवीन वर्षाच्या कॅलेंडर ची खरेदी झाली, की 'ओके म्हणजे इयर एंडींग जवळ आलंय' हे माझ्या लक्षात येतं...
यावर्षीसुद्धा तसंच झालं. नवीन वर्षाचं कॅलेंडर वगैरे आलं, आणि नवीन वर्षाचं रिझॉल्यूशन करूया असं खूळ सालाबादप्रमाणे माझ्या डोक्यात शिरलं... आता पुढचा प्रश्न होता, 'की रिझॉल्यूशन नेमकं काय करायचं?' आधी विचार आला की पानचट जोक्स, अर्थात पीजे मारणं कमी केलं, तर नव्वद टक्के मित्रमैत्रीणींना नक्कीच फायदा होईल... पण हे रिझॉल्यूशन काही पटत नव्हतं... प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट ॲनालिसीस करायची अनेक इंजिनिअर्सना सवय असते... मीसुद्धा त्यातलीच एक... त्यामुळे कोणतं रिझॉल्यूशन केलं, तर सर्वात जास्त फायदा होईल याचा खूप विचार केला... मग आठवलं, की लॉकडाउनने अगदी सर्वांनाच वजनवाढीची भरघोस देणगी दिलीये... आणि वजन कमी करण्याचं रिझॉल्यूशन केलं, तर ते नक्कीच फायदेशीर ठरेल... त्यामुळे मी 'वजन कमी करायचं' रिझॉल्यूशन करून टाकलं, आणि ३१ डिसेंबरच्या जवळपास चार ते पाच दिवस आधीपासूनच मिशन वेटलॉस सुरु केलं... (हो चार-पाच दिवस आधीपासूनच... कारण कोणताही प्लॅन व्यवस्थित execute होण्यासाठी टेस्टींग गरजेचं असतं... त्यामुळे माझा प्लॅन व्यवस्थित execute होण्यासाठी मी काही दिवसांचा टेस्टींग period ठेवला होता (Thanks to IT🙊)
दुसऱ्या दिवशीपासून 'मिशन वेटलॉस' ला सुरुवात केली, आणि आपण पुढील पदार्थ खायचे नाहीत असं म्हणून आईस्क्रीम, केक, चॉकलेट, वडापाव, पिझ्झा, पाव असलेले पदार्थ, बाहेरचे मसालेदार पदार्थ असे कोणतेच हेवी पदार्थ मी खाणार नाही आणि फक्त सूप पिणार असा निश्चय करून टाकला... स्विगी, झोमॅटो, ओव्हनस्टोरी वगैरे फोन मधून अनइन्स्टॉल करण्याचा विचार होता, पण मिशनच्या पहिल्याच दिवशी इतकं डेअरिंग माझ्यात तरी नव्हतं... त्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला...
या मिशनमुळे मला एक गोष्ट पूरेपूर कळून चूकलीये की 'अगर तुम किसी भी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हे मिलाने की कोशिश करती है' हा डायलॉग वेटलॉसच्या बाबतीत मात्र फूल फ्लॉप आहे... कारण वेटलॉस करणार असं मनापासून ठरवलं मात्र; Testing period च्या पहिल्याच दिवशी सगळ्या फूड ॲप्सच्या अनेक ऑफर्सची नोटिफिकेशन्स यायला सुरुवात झाली... स्वत:चा कंट्रोल पहायला मुद्दाम नोटिफिकेशन्स ऑफ केली नाहीत असा माझा दावा होता (पण खरं कारण हे आहे की फूडी असल्यामुळे Deep Down मलासुद्धा ही नोटिफ्स हवी असतात...). अखेर, या अनेक नोटिफ्सना बळी न पडता माझा दुपारचा लंच (लंच दुपारचाच असतो त्यामुळे दुपारचा लंच असं लिहायची काही गरज नव्हती, पण चलता है🤣) व्यवस्थित झाला, रात्रीच्या जेवणापर्यंतसुद्धा कंट्रोल टिकला... रात्री जेवल्यानंतर 'चला, या सगळ्या ॲप्सवर जस्ट जाऊन बघूया काय सुरु आहे' (हो कारण ultralegends फेसबुक, इंस्टा न वापरता food apps वर सर्फिंग करतात🙊) असं म्हणत झोमॅटो उघडलं, आणि सर्फ करता करता एक भारी ऑफर दिसली... आईस्क्रिमवर थेट पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ऑफ... (पण वरवर भारी वाटणाऱ्या ऑफर्स चा 'खरा चेहरा' काही खास नसतो..) त्यामुळे मी त्या ऑफरकडे दुर्लक्ष केलं... पण पाच मिनीटांनंतर 'Cart मध्ये टाकून तर बघूया.. हरकत नाहीये...' असा विचार करून आवडते फ्लेवर्स कार्ट मध्ये टाकले, आणि पहाते तर काय... ती ऑफर खरोखरच भारी होती...आईस्क्रीमचे आवडते फ्लेवर्स एकदम स्वस्तात... त्यामुळे लगेच आईस्क्रीम ची ऑर्डर द्यायला कोणाचाही विरोध नव्हता... आईस्क्रीम घरी आल्याआल्या 'कल करे सो अब' म्हणत लगेच खाऊन 'उद्यापासून मिशन वेटलॉस परत सिरियसली सुरु' असं म्हणूनसुद्धा झालं...
पहिल्या दिवशीच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून दुसऱ्या दिवशी तर थोडा व्यायामही केला, लंचसुद्धा व्यवस्थित झाला, पण ओळखीतल्या एकांनी खास माझ्यासाठी खाऊ म्हणून गरमगरम वडापाव आणि डेअरीमिल्क सिल्क पाठवून दिली... आणि त्यादिवशी सुद्धा मिशन वेटलॉस बोंबललं... तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही परत एका फूड ॲपवर 'भारी डिस्काउंट विथ नो मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू' अशी खरंच चांगली ऑफर मिळाली, आणि परत डाएटिंग गंडलं... ३१ डिसेंबर ला 'आज तर थर्टीफर्स्ट आहे' म्हणून मसालेदार खाऊन झालं... आणि दिवसेंदिवस माझं मिशन वेटलॉस गंडतच गेलं... दररोज फसत गेलेल्या मिशन वेटलॉस मुळे मला 'तारक मेहता...' मधल्या जेठालालची आठवण झाली, आणि क्षणभर गोकुलधाम सोसायटीत जाऊन अंजली आंटींकडून मस्त डाएट प्लॅन बनवून घ्यावा असंही वाटलं😜
अखेर चार पाच दिवसांचा Testing Period संपल्यावर माझ्या या रिझॉल्यूशन प्लॅनमध्ये bug च bug आहेत हे मला अगदी व्यवस्थित कळून चूकलं... फूडी असल्यामुळे रिझॉल्यूशन बोंबलल्याचा आनंदच झाला होता...'यार कशाला करायचाय वेटलॉस' असं स्वत:च स्वत:ला म्हटलं... आणि 'ये जवानी है दिवानी' मधला बनी म्हणतो तसा 'खूद पे दया करना बंद करो, और खूद पे प्यार करना सिखो... तुम जैसे भी हो, बिल्कुल ठिकठाक हो' असा डायलॉग मारत
Testing Result: Bug
Remarks: खूद पे दया करना बंद करो, और खूद पे प्यार करना सिखो... तुम जैसे भी हो, बिल्कुल ठिक ठाक हो...
असं कन्क्ल्यूजन काढत मी दूसरं रिझॉल्यूशन काय करायचं हे ठरवायला लागले... 🙊
तळटीप: जर तुम्ही पोस्टच्या सुरुवातीला 'मिशन वेटलॉस' वाचून 'वाह, बहुतेक हिचं वजन झालं वाटतं कमी' अशा अपेक्षेने उरलेली पोस्ट वाचली असेल, तर पोस्ट च्या शेवटी #crossover झाल्याबद्दल I am so sorry😂🙊
Khoopach chaan❤️
ReplyDeletePan pj bandh karaych resolution ghetla asta tar bara jhala asta😂(mi motivate pan kela asta)
😂😂
Deleteतुम जेसे हो वेसेही
Deleteबहोत प्यारे हो
ऐसेही रेहेना