प्रिय जूनी गाणी...♥️
प्रिय जुनी गाणी,
खरंतर तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम फक्त 'प्रिय' या शब्दात मावणारं नाहीये. 'अतिप्रिय' या शब्दाचीसुद्धा इंग्रजीमध्ये असते ना, तशी एखादी सुपरलेटिव डिग्री असावी, असं वारंवार वाटतं आम्हाला तुमच्याबद्दल व्यक्त होताना, तुमची स्तुती करताना... अगदी 'अतिप्रिय' हा शब्द आणि 'खूप प्रेम' हा हॅशटॅग सुद्धा कमी पडेल इतकं प्रेम आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. कोणतीही जागा असो, कोणतीही व्यक्ती समोर असो, तुमचा विषय निघाला, की आम्ही नेहमीच भरभरून बोलतो, पण या भरभरून बोलण्याच्या नादात कधीतरी 'खास तुमच्यासाठी काहीतरी लिहावं' असं वाटलंच नाही आम्हाला. अर्थात तुमच्यासाठी काहीतरी लिहायचं म्हटलं, तर किती आणि काय काय लिहू असंच होईल आम्हा नाईन्टीज किड्सना, पण आज डायरेक्ट तुम्हालाच आणि तुमच्यासाठी काहीतरी लिहावं असं ठरवलंय, आणि लिहायला बसलोय... अर्थात एक गोष्ट नक्की आहे की आम्ही काही 'तुमच्यात असलेल्या प्रत्येक शब्दाइतकं, अर्थात तुमच्या लिरिक्स इतकं सुंदर' लिहू शकत नाही, पण खास तुमच्यासाठी असं छान काहीतरी लिहायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय...
नेमकी सुरुवात कुठून करु? तुम्ही मोटीवेटर आहात यार आमचे. म्हणजे बघा ना... आमच्यासमोरील परिस्थिती कशीही असो, आमचा मुड कितीही खराब असो. तुमच्यातील एक ओळ जरी ऐकली ना, तरी लगेच फ्रेश वाटायला लागतं. पाच ते सहा मिनिटांत समोरच्याचा मुड परफेक्ट करणं कसं जमतं रे तुम्हाला? अगदी कुठलंही ठिकाण असो, कोणतीही वेळ असो, कोणताही ऋतू असो, तुमच्यातली एक ओळ जरी ऐकली ना, तरी वेगळाच उत्साह संचारतो आमच्या अंगात. अरे, छान गाता येत नसलं तरी काय झालं? तुम्हाला ऐकताना मात्र आम्ही नकळतपणे काही वेळासाठी गायक बनतो, आणि तुमच्यासोबत गुणगुणायला लागतो...
तुम्हाला माहितीये? असं म्हणतात, की जगात परफेक्ट अशी कोणतीच गोष्ट नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव म्हणा, एखाद्यातील गुण म्हणा, कोणताही शोध सुद्धा एकदम परफेक्ट नसतो. अहो, अगदी एखाद्या दहा मार्कांच्या प्रश्नाचं दहा पानं भरून उत्तर लिहिलं, तरीही 'परफेक्ट नसल्यामुळे' जास्तीत जास्त सात गुण मिळतील. पण तुम्ही इतके 'परफेक्ट' कसे रे? म्हणजे समोरची परिस्थिती तुम्ही इतक्या चपखलपणे मांडता ना, की एखादा तुमच्यातील चूका काढायला बसला (अर्थात तुमच्यातल्या चूका काढायला बसेल अशी व्यक्ती या जगात सापडणं अशक्य आहे), तर स्वतःच फेल होईल. तुमच्या प्रत्येक शब्दांत, तुमच्या चालीत, तुमच्या संगीतात काय जादू आहे आम्हाला ठाऊक नाही, पण तुम्ही 'परफेक्ट' आहात हे मात्र अगदी निर्विवाद सत्य आहे...
तुमची अजून एक जादू म्हणजे 'वातावरण निर्मिती'. कसली कमाल वातावरणनिर्मिती करता अरे तुम्ही... तुम्हाला ऐकताना आपल्यासमोरच तो प्रसंग घडतोय, किंवा आपणच या गाण्याचा भाग आहोत असं वाटायला लागतं आम्हाला. म्हणजे बघा ना, 'रिमझिम गिरे सावन' गाणं ऐकल्यावर कोणताही ऋतू असो; आपसूकच पाऊस, मातीचा सुगंध आणि हिरवळ आमच्या डोळ्यासमोर येते. 'ये शाम मस्तानी' ऐकताना एका रम्य सायंकाळी कोणीतरी आपल्यासाठीच हे गाणं म्हणतंय असं वाटतं. मुझे डोर कोई खिचे, तेरी ओर लिये जाय... आहा... हे जादूई शब्द कसे नाही आवडणार कोणाला? 'अच्छा जी मै हारी चलो' म्हणताना आपलंच आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय, आणि आपणच त्याला मनवतोय असं वाटतं, तर 'कोरा कागज था' ऐकताना 'आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आपल्यासाठीच हे गाणं गातेय' असं दृश्य डोळ्यासमोर उभं रहातं, 'ये है बॉम्बे मेरी जान' ऐकल्यावर डोळ्यासमोर पूर्वीची मुंबई उभी रहाते, आणि मुंबईबद्दल मनात असलेलं प्रेम अधिकाधिक वाढतं... अनेक उदाहरणं देता येतील अशी... तुम्ही आम्हाला फक्त शब्द 'ऐकायला' नाही तर शब्द 'जगायला' भाग पाडता. अरे ऑगमेंटेoड रिॲलिटीला सुद्धा लाजवेल, इतकी जादू आहे तुमच्यात... आणि त्यासाठी तुमच्याशी संबंधित सर्व गायक, गीतकार, संगीतकार, तंत्रज्ञ, सगळ्या, अगदी सगळ्या व्यक्तींना सॅलूट करावासा वाटतो...
तुम्ही कोणाला आवडत नाही रे? तुम्ही सर्वांनाच आवडता. यामध्ये विशेष आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे आम्हा 'नाईन्टीज किड्स' चा. आमच्या मनात तुमच्याविषयीचं प्रेम किती आहे ना, हे शब्दात नाही सांगता येणार. आम्हा नाईन्टीज किड्सच्या आणि तुमच्या प्रेमाची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली. म्हणजे आमच्या लहानपणी नेट वगैरे नव्हतं, पण रेडिओवर तुम्हाला ऐकताना काय भारी वाटायचं म्हणून सांगू! त्या लहान वयात तुमच्यातील शब्दांचा अर्थ वगैरे कळायचा नाही, पण तुम्हाला ऐकताना 'यार ये तो बहोत मस्त है' असं राहूनराहून वाटायचं. प्रत्येकवेळी आई-वडिलांकडून तुमची खूप स्तुती ऐकायला मिळायची. म्हणजे 'अमुक अमुक चित्रपटातलं हे गाणं इतकं छान आहे', 'त्या गाण्यातील शब्द इतक्या छानप्रकारे बांधलेत' वगैरे वगैरे असं ते नेहमी म्हणायचे. शास्त्रशुद्ध गाण्याचं शिक्षण वगैरे घेतलं नव्हतं, पण तुम्ही सुरु झालात ना, तेव्हा रेडिओसोबत आईवडिल पण गुणगुणायला लागायचे. प्रत्येकवेळी आम्ही तुम्हाला ऐकताऐकता 'हे कोणत्या चित्रपटातलं गाणं?' 'हे गाणं कोणी लिहिलं?', 'हे गाणं कोणी गायलं?' असे अनेक प्रश्न आमच्या आईवडिलांना विचारायचो, आणि यु नो व्हॉट, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे असायचं. कारण एकच; त्यांच्यासुद्धा मनात तुमच्याविषयी तितकच प्रेम होतं, अजूनही आहे, आणि हेच प्रेम आमच्यादेखील मनांत उतरलंय...
हळूहळू आम्ही मोठे झालो, तुमच्यातील शब्द कळू लागले, तुमच्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्वत:शी रिलेट करता यायला लागला, आणि हे प्रेम दिवसेंदिवस वाढंतच गेलं. स्मार्टफोन, इंटरनेट आलं आणि या प्रेमाला 'चार चांद लागले'. रेडिओपासून सुरु झालेलं तुमच्याविषयीचं हे प्रेम इंटरनेट पर्यंत जाऊन पोहोचलं. हे प्रेम इतकं आहे, की आजही एखादी नवी कॉलर ट्यून ठेवताना सुद्धा आम्ही जून्या गाण्यांच्या शोधात असतो...आम्ही नव्या गाण्यांना ऐकत नाही असं नाही, आम्ही कधीतरी नवी मराठी, हिंदी, इंग्रजी गाणीसुद्धा ऐकतो. पण खरं सांगू, 'हमें डोर कोई खिचे, आपकी ओर लिये जाय' असं होतं, आणि आमचं मन, आमची आवड फिरून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते... कारण, तुमची नशा आणि जादू काही वेगळीच आहे यार... तुमच्यापैकी 'हे गाणं माझं आवडतं' असं ठाम सांगतच नाही आम्ही कधी, कारण आम्हाला माहितीये, की तुमच्यापैकी कुठलंही गाणं ऐकलं, तरी ते आवडणारच आवडणार, आणि प्रत्येकवेळी वेगवेगळं गाणं आमचं 'फेवरेट गाणं' बनणार...
तुम्ही आम्हाला खूप कायकाय दिलंय, अजूनही देताय. अरे लहानपानापासून तुमच्यावर इतकं प्रेम केलेलं असताना भेंडी चढायची काय बिशाद...? तुम्ही आमच्यासाठी अंताक्षरीमधले सेव्हिअर झालात, व्हॉट्सॲप स्टेटस वर टाकायला छानछान ओळी तुम्हीच दिल्यात... आमचा मूड चांगला असो वा वाईट, तो सुधारायचं टॉनिक, कितीही तणाव असला, तरी एक हक्काचा स्ट्रेसबस्टर तुम्हीच झालात... मध्यरात्री असायनमेंट्स लिहिताना, अभ्यास करताना तुम्हीच आमचे सोबती झालात... कधीकधी आम्हाला मध्यरात्रीपर्यंत झोप नाही लागायची (मे बी ड्यू टू ओव्हरथिंकिग😜), पण मध्यरात्री एकटेच जागत असताना 'मै हू ना' म्हणत तुम्हीच आमच्यासोबत राहिलात... ट्रेनमधून जाताना असो, वा लांबच्या प्रवासात असो, तुम्हीच आमचे साथीदार झालात... आजही कधी एकटेपणा वाटला, घरी बसून कंटाळा आल्यासारखं वाटलं, तरीही तुम्हीच आमच्यासाठी धावून येता, आणि आमचा कंटाळा पळवून लावता... तुम्ही आम्हाला खूप काही दिलंय, आणि पुढील काळातदेखील खूप काही देत रहाणार आहात... त्यामुळे 'तुम्ही आम्हाला कायकाय दिलंय' ही सर्व लिस्ट तर कधीच न संपणारी आहे.
आम्हा नाईन्टीज किड्सना भले नवी गाणी माहित नसतील, पण 'तुम्हाला ओळखत नाही' अशी व्यक्ती मात्र शोधूनही सापडणार नाही. तुम्हाला एक सांगू का? आम्हाला ना हल्ली अनेकजण 'मॉडर्न', 'आधुनिक पिढी' वगैरे म्हणून संबोधतात. पण खरं सांगू? आम्ही कितीही मोठे किंवा मॉडर्न झालो असू, या जगात कुठेही गेलो असू, खायला पिझ्झाबर्गर सारख्या मॉडर्न गोष्टी मागत असू, पण जेव्हा गाणी ऐकायचा विषय निघतो, किंवा यापुढे कधीही निघेल ना, तेव्हा 'मॉडर्न' असूनही आम्ही तुम्हालाच ऐकत राहू, अगदी केव्हाही, कधीही, कुठेही... नेहमीच...
खूप मोठं झालं ना पत्र? अरे पण आमच्या मनातील तुमच्याविषयीच्या भावना मांडायच्या म्हणजे शब्द कमी पडतील अशीच गोष्ट... खरंतर आपल्या अत्यंत आवडत्या गोष्टीचे कधीही आभार मानायचे नसतात. पण, आज मात्र तुमचे आभार मानावेसे वाटतायत... आमच्या आयुष्यात येऊन, प्रत्येक प्रसंगी आमच्यावर तुमच्यातील सुरांची, शब्दांची, चालीची जादू करण्यासाठी, आमच्या आयुष्यात कायम रहाण्यासाठी खूप खूप थॅंक्यू...
तुम्हीच म्हणालायत ना?
'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे...' त्यामुळे तुम्ही अशीच जादू आमच्यावर कायम करत रहाल... आणि तुमच्यातील, व आम्हा नाईन्टीज किड्स मधील हे प्रेम, ही मैत्री कायम अशीच राहिल हे आम्हाला एकदम नक्की, अगदी शंभर टक्के माहितीये...
-तुमचेच खूप मोठे फॅन्स
नाईन्टीज किड्स...
तुमच्या मनातील जुन्या गाण्यांविषयीच्या भावना, जुन्या गाण्यांविषयीच्या तुमच्या मनातील आठवणी कमेंट्समध्ये नक्की शेअर करा...!
एकदम भारी.. आवडता विषय जुनी गाणी..
ReplyDeleteThanks😊
Deleteसही।।।।।।
ReplyDeleteThanks😊
DeleteMast
ReplyDeleteThanks😊
Deleteअस्त मस्त..
ReplyDeleteThankss😊
Deleteखूप छान. Something मनातलं 100%टक्के खरं!
ReplyDeleteThanks😊😊
Deleteखूप छान लिहिलं केतकी... जुने ते सोने, असे म्हणतात ना. जितक्या वेळा ऐकलं तितकी Value वाढत जाते त्या गाण्यांची.
ReplyDeleteThanks divya
DeleteThanks😊
Delete