टी तिथे आम्ही...

'चहा' म्हटलं, की 'आहा' असा उद्गार आपसूकच कोणाच्याही तोंडून बाहेर पडतो. मी स्वत: चहाप्रेमी नसले, (एक मिनिट... तुम्ही याचा अर्थ मी कॉफी किंवा सरबतप्रेमी वगैरे आहे असा घेऊ नका... कारण मला त्या गोष्टीही फारशा आवडत नाहीत...), तरीही माझे अनेक मित्रमैत्रिणी, आणि ओळखीचे खूप लोकं चहाप्रेमी असल्यामुळे आजची पोस्ट जगातल्या सर्व चहाप्रेमींसाठी...

'चहा' हा शब्द उच्चारला की 'यहा हम पिघल गये' असं अनेकांचं होतं...हे चहाप्रेमी बी पॉजिटीव नाही, तर टी पॉजिटिव असतात. मोबाईलमध्ये कसं, काहीही झालं तरी 'प्लेन मोड वर टाक आणि काढ' हे जागतिक सोल्यूशन असतं, अगदी तसंच कोणतीही समस्या असली किंवा टेन्शन असलं, तरीही 'एक कप चहा' हे सगळ्या चहाप्रेमींचं परमनन्ट सोल्यूशन असतं... मी हे इतक्या ठामपणे लिहितेय, कारण माझ्या ओळखीत अनेकजण चहाप्रेमी आहेत, आणि 'चहा हे पूर्णब्रम्ह' असं मानणारे बरेचजण तुमच्याही ग्रूपमध्ये असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे...

चहाप्रेमींचं चहा हे 'परमनंट पहिलं प्रेम' असतं... ( नाही, म्हणजे मला माहितीये की ही ओळ वाचून चहा आणि पहिलं प्रेम यांतला एक महत्त्वाचा फरक तुमच्याही डोक्यात आला असेल), पण तरीही चहा ची तुलना आपण पहिल्या प्रेमाशी केली, तरी वावगं ठरणार नाही. फक्त इकडे एक महत्त्वाचा फरक आहे; पहिलं प्रेम टिकून राहिल किंवा नाही याची खात्री देता येत नाही, पण चहाच्या बाबतीत मात्र असं कधीच होत नाही, आणि होणारही नाही (मी वर पहिलं प्रेम लिहायच्या ऐवजी परमनंट पहिलं प्रेम का लिहिलं हे तुम्हाला कळलं असेलंच...)

काही दिवसांपूर्वी एक मिम वाचला होता, 'चाय पिओगे क्या होता है भाई?'  'हम तो जरूर पियेंगे... हमेशा पिते रहेंगे...'. खरंच आहे... चहाप्रेमी प्रत्यक्ष आयुष्यात तर चहावर प्रेम करत असतातच, पण त्यांचं चहाप्रेम '#खूप प्रेम' या हॅशटॅग खाली सोशल मिडियावर देखील दिसून येतं. टॅग अ टी पॉसिटीव्ह, टॅग अ चाय लव्हर यांसारख्या अनेक पोस्ट हे चहाप्रेमी सोशल मिडियावर शेअर करतात, आणि अशा पोस्ट्समध्ये ग्रूपमधील प्रत्येक चहाच्या चाहत्याला हमखास टॅग केलं जातं. अगदी परीक्षेच्या कालावधीत रात्री जागतानासुद्धा 'लेट नाईट अभ्यासाचं टॉनिक, एक कप चहा' अशा या चहा फॅन्सच्या पोस्ट्स देखील तुम्ही नक्कीच बघितल्या असतील.

चहाच्या आवडीला वय, काळ, स्थळ, वेळ यांच बंधन नसतं. या चहाप्रेमींची चहाची क्रेझ इतकी भयंकर असते, की 'टी तिथे मी' यांसारखे कॅप्शन्स लिहिलेले टीशर्ट्स वापरण्यात देखील हे चहाते कमी करत नाहीत. ग्रूपमध्ये एखादा कॉफीप्रेमी वगैरे असेल, तर कधीकधी 'चहाप्रेमी आणि कॉफीप्रेमी' अशी भांडणं देखील ऐकायला मिळतात, पण ग्रूपमधील चहाप्रेमी एकत्र येऊन 'मेजॉरिटी विन्स' या ओळीला सार्थ ठरवत 'चहा हाच बेस्ट' असं कॉफीप्रेमींना समजाविण्यात यशस्वी होतात... कधीकधी ग्रूपमधील एखाद्या 'चहा फॅन' नसलेल्याने 'चहा आरोग्यासाठी वाईट आहे' असं म्हटलंच, तर त्यावर एखादा चहाचा चाहता  'वो मुहाब्बत ही क्या, जो तकलिफ ना दे' असा 'डीप' डायलॉग फेकत 'कुछ दिन गुजारो चाय के साथ, फिर चाय कभी नहीं छोडेगी तुम्हारा साथ' असं म्हणत टी हेटर्स चं रूपांतर 'टी लव्हर्स' मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. 

चहाप्रेमींच्या चहाच्या वेडाला कसलंही बंधन नसतं हे खरं आहेच, पण पावसाळा आला, की या चहाप्रेमाला वेगळंच रूप मिळतं. पावसाळ्यातील थंड आणि शांत वातावरणात गरम गरम वाफाळता कटिंग मारणं किंवा घरी शांतपणे बसून 'वाफाळता चहा आणि सोबत आवडीचं पुस्तक' हे कॉम्बिनेशन म्हणजे चहाप्रेमींसाठी स्वर्गसुखचं.....!

खऱ्या चहाप्रेमीची 'चहा प्यायची' सुद्धा एक वेगळीच पद्धत असते. पहिले चहाचा तो रंग डोळे भरून डोळ्यात साठवून ठेवायचा, त्यानंतर त्यामधून येणाऱ्या वाफा न्याहाळत त्यातून येणारा सुगंध नाकात साठवायचा, आणि मग चहाचा पहिला घोट घ्यायचा. असं केल्यानंतर 'वाह' असा उद्गार कोणाच्याही तोंडून बाहेर पडल्याशिवाय रहात नाही.. आजकाल 'मसाला चाय', 'अद्रक मारके चाय', 'इलायची चाय', 'रोझ टी', 'चॉकलेट टी' असे चहाचे अनेक प्रकार असले तरीही 'डिव्हायडेड बाय फ्लेवर्स, युनायटेड बाय 'गरम चाय' हे वाक्य मात्र तरुणाई पुरेपूर अनुभवताना दिसते. घरचा चहा कितीही प्यायला तरी टपरीवरील चहाचा सुगंध चहा प्रेमी असलेल्या, नसलेल्या सगळ्यांनाच भुरळ पाडतो आणि सर्वांची पाऊले आपसूकच तिकडे वळतात.

थोडक्यात काय, तर एका वेबसिरीज मधील 'सिर्फ एक्कीस दिन का खेल है दोस्त, फिर आदत अपने आप होजायेगी' असा फेमस डायलॉग फॉलो केल्यावर इतर व्यसनं सुटू शकतील, पण 'चहाचं' व्यसन सुटणं मात्र 'मुश्किल नहीं, नामुमकीन है दोस्त...!' कारण 'हमारे लिए तो चाय ही भगवान है....'


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️